नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या रणसंग्रामाच्या पहिल्या टप्प्यात भाजपला मराठवाडय़ात माफक यश मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर या पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि विविध भागांतील नेत्यांवर मोठे दडपण आले आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळय़ा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ एकूण संख्येच्या तुलनेत अत्यंत नगण्य असून, या पाश्र्वभूमीवर हा पक्ष आता जिल्ह्यातील ९ नगर परिषदा व २ नगरपंचायतींच्या निवडणुकांना सामोरा जात आहे. , तर बिलोलीतील आघाडीच्या प्रयोगात भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.

२७ नोव्हेंबर रोजी वेगवेगळय़ा विभागांत झालेल्या पालिकांच्या निवडणूक निकालात भाजप अव्वलस्थानी राहिल्याने पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी सुखावले आहेत. नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून व्हावी, अशी सूचना मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांकडे मांडणाऱ्यात नांदेड जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर हे एक होते. शासनाने तसा निर्णय घेतल्यानंतर तब्बल ५२ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आल्यामुळे रातोळीकर यांनी आनंद व्यक्त केला.

पण मराठवाडय़ात भोकरदन, परतूर, परळी, परंडा या भाजप नेत्यांच्या गावांमध्ये पक्षाला अपयश आल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांवरील दडपण वाढले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी काँग्रेसचा तर काही नगरपरिषदांमध्ये ‘राष्ट्रवादी’चा वरचष्मा आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांपकी किमान ६ ठिकाणी भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आणण्याचे उद्दिष्ट स्थानिक नेत्यांनी ठेवले असल्याचे सांगण्यात येते. ते गाठण्यासाठी पक्षाकडून भरपूर रसद मिळावी, पक्षाचे मंत्री व प्रभावी वक्त्यांनी जिल्ह्यात यावे, अशी विनंती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रातोळीकर मुंबईला गेले आहेत.

भाजपने कुंडलवाडी, देगलूर, मुखेड आदी नगरपालिकांत शिवसेनेशी युती केली. बिलोलीत आघाडी आणि अन्यत्र पक्ष स्वबळावर लढत आहे. मुखेडला पूर्वीचा मोहनावती आघाडीचा गट आता भाजपकडून मदानात उतरला असून, तेथील सत्ता कायम राखण्याचे आव्हान स्थानिक आमदारासमोर आहे. तर बिलोली, कुंडलवाडी आणि देगलूरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना सत्तेतून हद्दपार कण्याची मोठी जबाबदारी भास्करराव खतगावकरांवर आहे. बिलोलीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक ते उमेदवार न मिळाल्याने खतगावकर यांनी आघाडीचा प्रयोग केला.

हदगावमध्ये सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेसह काँग्रेस विरुद्ध लढण्याचा विडा उचलला आहे. भाजपने कंधारमध्ये चिखलीकर व शिवसेनेशी युती न करता स्वबळाचा प्रयोग केला आहे. शिवसेनेच्या दोन आमदारांविरुद्ध भाजप लढत आहे. या पक्षाची सर्वात मोठी लढाई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी आहे. भाजपच्या विजयी रथाची घोडदौड नांदेड जिल्ह्यात थोपवण्यासाठी चव्हाण व त्यांचा काँग्रेस पक्ष आता सज्ज होत आहे.’