भाजपचे २३ खासदार जिल्हय़ातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी उद्या,रविवारी लातुरात येत आहेत. जिल्हय़ातील विविध जि. प. मतदारसंघांत ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी लातुरात टाऊन हॉलच्या मदानावर होणाऱ्या जलजागरण सभेत प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे भाषण करणार आहेत.
जिल्हय़ात आतापर्यंत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दौरा करून भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. या पाश्र्वभूमीवर भाजपने सर्व २३ खासदार घेऊन दहाही तालुक्यांत लोकांशी संवाद साधण्याचे ठरवले आहे. सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचतात की नाही? शेतकऱ्यांचे प्रशासनासंबंधी नेमके काय गाऱ्हाणे आहे, हे ऐकून घेऊन सायंकाळी सर्व खासदार आपले म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार आहेत.
दोन महिला खासदार लातूर शहरातील विविध भागांत लोकांशी संवाद साधणार असून, या माध्यमातून लातूरकरांचे म्हणणेही जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात येणार आहे.
गेल्या महिनाभरापासून मिरजेहून लातूरला पाणी पोहोचवले जात आहे. रेल्वेचे पाणी प्रत्यक्ष लातुरातील लोकांपर्यंत पोहोचते की नाही, हेही लोकांकडून समजून घेऊन त्यासंबंधी प्रशासनाला सूचना केल्या जाणार आहेत.
लातूर शहरातील जे नागरिक जलपुनर्भरण उपक्रम राबवणार आहेत, त्यांना लागणाऱ्या खर्चापकी निम्मा खर्च भाजपच्या वतीने उचलला जाणार असून वस्तुरूपात ही मदत केली जाणार आहे.