18 January 2019

News Flash

पक्षनिष्ठा गौण, ‘अर्थ’कारण सरस!

निवडणुकांच्या केंद्रस्थानी जर पैसा असेल तर त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा आम्ही अधिक सरस आहोत

|| सुहास सरदेशमुख

निवडणुकांच्या केंद्रस्थानी जर पैसा असेल तर त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा आम्ही अधिक सरस आहोत, असा संदेश अधोरेखित करीत उस्मानाबाद-बीड-लातूर या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने यश मिळविले. पुरेसे संख्याबळ नसतानाही धस यांनी मिळविलेले यश अनेक अर्थाने राजकारणाचे ढळढळीत वास्तव सामोरे आणणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचे समर्थक टिकवून धरता येत नाहीत. दुसरे म्हणजे काँग्रेस आता पुरती पंगू झाली आहे आणि भाजपची अंतर्गत रचना आता पूर्णत: काँग्रेसी संस्कृतीशी एकरुप झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील वेगवान राजकीय घटना आणि घडामोडीत राष्ट्रवादीची नाचक्की झाली. विशेषत: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मोठी चपराक बसली आणि पंकजा मुंडे यांचे जिल्हय़ातील राजकीय समीकरण अधिक सूत्रबद्ध झाले.

उस्मानाबाद-बीड-लातूर या तीन जिल्ह्य़ांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ५२७ मतदार होते आणि सेना-भाजपचा आकडा होता ३६७. धस यांना बरोबर ५२७ मते मिळाली. त्यांच्याकडे असणाऱ्या पक्षीय ताकदीपेक्षा १६० मते त्यांनी अधिकची मिळवली. ही मते अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फुटलेल्या सदस्यांची आहेत. उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक. त्यामुळेच राष्ट्रवादीने या विधान परिषदेच्या जागेवर दावा केला. त्याला काँग्रेसचा अवसानघातकी निर्णयही कारणीभूत होता. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असताना या जागेवर कधीही राष्ट्रवादीला दावा सांगता आला नाही. विलासराव नसताना या मतदारसंघात आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे, अशी जिगर काँग्रेसच्या नेत्यांनी बाळगली नाही. दिलीपराव देशमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि काँग्रेस अध्यक्ष अशोकराव चव्हाण या निवडणुकीत साधे प्रचारालाही फिरकले नाही. आमदार अमित देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याचे धोरण जाहीर केले. दिलीपराव देशमुख म्हणायचे, काँग्रेसचे एकही मत फुटणार नाही. वास्तव मात्र काहीसे वेगळेच होते. हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

उमेदवार निवडून आणण्याची ताकद असतानासुद्धा बेभरवशाच्या आघाडीला अडकवता येते, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात होण्यापूर्वी सुरेश धस तसे भाजपमध्ये दाखल झालेच होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांना अधिकृत प्रवेश देण्यात आला. धस यांच्यासमोर कोण उमेदवार असेल हे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरवले, पण प्रतिस्पर्धी उमेदवारानेच ऐनवेळी माघार घेतली. रमेश कराड यांच्या माघारीमुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीची चर्चा ‘पैशां’भोवती केंद्रित झाली. ‘कराड यांच्याकडे निवडणुकीला लागणारा पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी माघार घेतली’, हे शरद पवार यांनीसुद्धा मान्य केले. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकांना नक्की पैसा किती लागतो याची चर्चा सुरू झाली. कराडांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे, परत भाजपमध्ये येणे या घटना-घडामोडींत पैसा केंद्रस्थानी होता. हे नेत्यांच्या जाहीर वक्तव्यांमधून स्पष्ट होत होते. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये वारेमाप पैशांचा वापर योग्य की अयोग्य अशी साधी चर्चाही कोणी केली नाही. कारण तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम न्यायालयीन प्रतिक्रियेत अडकला. नगरसेवक अपात्र करण्यापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. पुढे मतदान प्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक नेत्याच्या तोंडी देवाण-घेवाणीची भाषा होती. त्यामुळेच मतदानादिवशी अगदी बूथवर पोहोचूनदेखील दिलीपराव देशमुखांसारख्या नेत्यांचे त्यांच्या समर्थकांनी ऐकले नाही, असाही अर्थ काढला जात आहे. एका अर्थाने काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा कोंडी झाली.

रमेश कराड यांना पुन्हा आपल्या बाजूने वळवणे, बीडमधील राष्ट्रवादीचा एक गट ‘बाद’ मतदानात जावा, अशी रचना लावणे, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील मोठा गट आपल्या बाजूने राहावा यासाठी सुरेश धस यांच्या पाठीमागे भाजपच्या नेत्यांची एक मोठी फळी काम करत होती. रमेश कराड यांना राष्ट्रवादीने दिलेली उमेदवारी त्यांनी नाकारावी यासाठी भाजपचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी प्रयत्न केले. या सगळ्या घटना-घडामोडींवर महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांचे बारकाईने लक्ष होते. स्वत: मुख्यमंत्रीही अनेकांशी चर्चा करत होते. परिणामी भाजप उमेदवाराकडे विजयकौल असेल, असे चित्र दिसून येत होते. असे असतानाही अपक्ष म्हणून अशोक जगदाळे यांनी मिळविलेली मते लक्षणीय आहे. उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मात्र मतदारसंघातील राष्ट्रवादीचे मत फुटणार नाही, याची काळजी घेतली होती. त्यामुळे बीड आणि लातूर या दोन जिल्ह्य़ांतच मतांची फाटाफुट अधिक झाली.

भाजपच्या या यशाने आष्टी-पाटोदा मतदारसंघातील भीमराव धोंडे यांचा मतदारसंघ अधिक सुरक्षित झाला आहे. निमित्ताने बीड लोकसभा मतदारसंघाची बांधणी पूर्ण झाली असल्याचे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. पक्षनिष्ठा गौण आणि अर्थकारण मोठे असेच या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

घडय़ाळ घातलेल्या हातांनी आपल्याला सर्वात मोठी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सामान्य नगरसेवक, जिल्हा परिषद, सदस्य पंचायत समिती सभापती यांच्यावर नजर ठेवण्याऐवजी आपल्या पक्षात तोडपाणी करीत कोण फिरत होते यावर नजर ठेवली असती, तर त्याचा फायदा झाला असता.   – सुरेश धस, नवनिर्वाचित आमदार

या निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री होती. मात्र, मतदानानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी भाजपची मते फुटली असल्याचा दावा करत होती तेव्हा निकालानंतर आपण बोलू, असे आपण सांगितले होते. निवडणूक निकालातून लातूरमधून भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली. शिवाय काँग्रेसची ४० पेक्षा अधिक मते सुरेश धस यांना मिळाली. मतदारांनी भाजपवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपण आनंदी आहोत.      – संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री, लातूर

या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय अनपेक्षित आहे. लोकशाहीत मते फुटण्याचे प्रकार दिल्लीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत घडत आहेत. याही निवडणुकीत ते घडले व त्यामुळेच आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे मान्य करावे लागेल.   – दिलीपराव देशमुख, माजी आमदार

सुजाण मतदारांनी सारासार विचार करून सत्याच्या बाजूने कौल दिला व सुरेश धस यांना विजयी केले. – रमेश कराड

आघाडीला धोबीपछाड

उमेदवार निवडून आणण्याची ताकद असतानासुद्धा बेभरवशाच्या आघाडीला धोबीपछाड देता येते, हे निवडणूक निकालाने स्पष्ट झाले.

First Published on June 13, 2018 12:48 am

Web Title: bjp ncp sharad pawar