औरंगाबाद : मराठवाडय़ात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी तालुकास्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत ‘सरकारविरोधात एल्गार’ आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यापासून ते महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांकडे लक्ष वेधून सरकारविरोधात यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर तर ग्रामीण भागात ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान प्रमुख वक्त्यांनी केलेल्या भाषणात शिवसेना टीकेच्या केंद्रस्थानी होती. शिवसेनेने विश्वासघात केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केल्यानंतर कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांचीही फसवणूक केली, अशा शब्दांत प्रमुख वक्त्यांनी महाआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे एजाझ देशमुख यांनी सध्याचे उद्धव ठाकरे हे थेट घरातून निघाले आणि मुख्यमंत्रिपदावर जाऊन बसले, अशा शब्दांत टीका केली.

या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे, की महाआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी पावसानंतरच्या नुकसानग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. मात्र महाआघाडी सरकारने प्रतिहेक्टरी आठ हजार रुपयांपेक्षा अधिकची मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू, अशा घोषणाही केल्या होत्या. महिला, मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरत आहे, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला. आंदोलनस्थळी माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड भाजपचे उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, भाई ज्ञानोबा मुंडे, नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे, समीर राजूरकर आदी उपस्थित होते.

उस्मानाबाद शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, रामदास कोळगे, भारत डोलारे, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले. जालन्यामध्येही जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका स्तरावर आंदोलन करण्यात आले.

लातूरमध्ये सर्व तहसीलसमोर धरणे

लातूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यासह शहर व तालुक्यातील भाजपचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य उपस्थित होते. निलंगा येथील धरणे आंदोलनात माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, अरिवद पाटील, दगडू साळुंके आदींनी धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले.

परभणीत आंदोलन

परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार ३८३ शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये सोयाबीनचा पीकविमा देण्यात यावा. तूर खरेदीचे निकष बदलण्यात आल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे ती दूर करावी, शेतकऱ्यांच्या पाल्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज तत्काळ माफ करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना देण्यात आले. या आंदोलनात भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, जि.प सदस्य राजेश देशमुख, अभय चाटे, मनपा गटनेत्या मंगल मुद्गलकर आदी सहभागी झाले होते.

हिंगोलीत दोन गटांची निवेदने

हिंगोलीतील भाजपच्या आंदोलनात स्थानिक दोन गटांनी स्वतंत्रपणे निवेदने दिल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आही. एका निवेदनावर माजी आमदार रामराव वडकुते, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, प्रशांत सोनी, सुनील जामकर, आशिष वाजपेयीसह ३० ते ४० पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर दुपारी १ च्या सुमारास भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव जाधव धरणे आंदोलन स्थळी आले. त्या ठिकाणी चारपाच कार्यकत्रे हजर होते. त्यानंतर जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला वेगळे निवेदन दिले. त्या निवेदनावर शिवाजीराव जाधव, प्रा. दुर्गादास साखळे, शंभुसिंग गहिलोद, राजू यादव, संदीप गिरीसह १३ लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी सरकारने शेतक ऱ्यांची फसवणूक केल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी भाजपाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकारांच्या बैठकीत केली. शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी भाजपचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

बीडमध्ये आंदोलनाला अल्प प्रतिसाद

विरोधी पक्षाच्या भूमिकेत भाजपने पहिल्यांदाच एल्गार आंदोलनासाठी आठवडाभरापासून तयारी केल्यानंतर प्रत्यक्षात मंगळवारी तालुका तहसील कार्यालयासमोर मोजकेच कार्यकत्रे आंदोलनात उतरल्याचे दिसून आले. बीड येथे खासदार प्रीतम मुंडे सहभागी झाल्याने त्यांच्याभोवती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती इतकेच. आठ दिवसांपासून भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन लक्षवेधी करण्यासाठी समाज माध्यमातून आणि बैठकातून तयारी केली होती. मात्र प्रत्यक्षात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार डॉ. मुंडे सहभागी झाल्याने या ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली होती. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश पोकळे, भगीरथ बियाणी, स्वप्निल गलधर सहभागी झाले होते. शिरूर, धारूर, अंबाजोगाई, केज, माजलगाव, परळी, आष्टी, वडवणी, पाटोदा, गेवराई या ठिकाणी तालुका अध्यक्ष व काही कार्यकत्रेच धरणे आंदोलनात दिसून आले. या वेळी आगामी काळात आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला.