दानवेंच्या मुलाच्या लग्नाला सर्वपक्षीय वऱ्हाडी

राजवाडय़ासारखे सोनेरी किरणांमध्ये न्हाऊन निघालेले प्रवेशव्दार.. त्याचा रंगही सोनेरी.. वर दोन्ही बाजूला मेघडंबरी.. प्रवेशद्वाराच्या बाजूला नाचणारे सोनेरी मोर.. स्वागताची एक पाटी. ‘दानवे-सरकटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.’ प्रवेशद्वारातून शिरले की, वर लटकलेली झुंबरे. त्यातून रंगीत रोषणाई. काही झुंबरांना फुलांचे हार. येणाऱ्या पाहुण्यांसाठी शहनाईच्या सूरांची बरसात. पुढे मोठ्ठे मैदान. जणू एका किल्ल्याचा भाग वाटावा अशी वास्तूरचना. सगळे काही सोनेरी रंगातले. भोवताली मोठ्ठे दिवे. खूप साऱ्या खुच्र्यावर बसलेली हजारो माणसे. वधुवरांना आशीर्वाद द्यायला मुख्यमंत्र्यांसह बहुतांश सारे मंत्रिमंडळ. आशीर्वादासाठी खासदार छत्रपती संभाजीमहाराज, धनंजय मुंडे, नारायण राणे आणि केंद्रातीलही मंत्री. असा माहोल गुरुवारी होता आमदार संतोष दानवे यांच्या विवाहसोहळ्याचा.

या सोहळ्याला मंत्र्यांना उपस्थित राहता यावे, यासाठी औरंगाबादचे विमानतळ  गजबजले होते. इथली वर्दळ इतकी होती की त्यालाही ‘ट्रॅफीक कंट्रोल’ करणे गरजेचे बनले.  प्रत्येक मंत्र्याला विवाहसोहळ्यापर्यंत जाण्यासाठी पोलिसांच्या गाडय़ांचा ताफा. एका बाजूला विवाहात उपस्थित राहणाऱ्यांची गर्दी आणि दुसरीकडे भोजनाची मोठी सोय. सर्वसामान्यांसाठी  मेनू नेहमीचाच. पाच-सहा प्रकारच्या भाज्या, गोड पदार्थ. एका बाजूला भोजनावळी सुरू होत्या. दुसरीकडे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खास भोजनाची वेगळी सोय. असा सत्तेभोवतीचा विवाहसोहळा औरंगाबादकरांनी अनुभवला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष आणि सरकटे यांची मुलगी रेणू यांच्या विवाहानिमित्त औरंगाबादमध्ये राज्यातील बहुतांश मंत्र्यांनी हजेरी लावली.