दुष्काळी स्थितीमुळे जि.प. पिंपळनेर गटाची पोटनिवडणूक बिनविरोध काढण्याचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले. अवघ्या सहा महिन्यांच्या सदस्यत्वासाठी भाजप, काँग्रेस आघाडी व शिवसंग्रामसह सहा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. स्थानिक पुढाऱ्यांच्या बठकीत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडी उमेदवारांनी माघार घेतल्याने या पक्षाच्या नेत्यांवर आता इतर पक्षाच्या उमेदवाराला समर्थन देण्याची नामुष्की ओढवली आहे.
जि.प. पिंपळनेर गटातील भाजप सदस्य मदन चव्हाण यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या गटासाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. आगामी जि.प. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या गटातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी कंबर कसली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसंग्राम, स्वाभिमानी आघाडी या प्रमुख पक्षांसह तब्बल ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दुष्काळी स्थिती व अवघ्या सहा महिन्यांसाठी सदस्यत्व मिळणार असल्याने निवडणुकीचा मोठा खर्च वाचवण्यासाठी निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रस्ताव पुढे केला होता. पहिल्या बठकीत बहुतांशी उमेदवारांनी बिनविरोध निवडीला हिरवा कंदील दिल्यानंतर या परिसरातील काँग्रेसचे जुने कार्यकत्रे नवनाथ थोटे यांचे नाव पुढे आले. दरम्यान शिवसेना, स्वाभिमानी आघाडीसह इतर पक्ष व अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शेवटच्या दिवशी स्थानिक पुढाऱ्यांमध्ये बठक झाली. मात्र, भाजप व शिवसंग्राम यांनी माघारीस नकार दिल्यामुळे निवडणूक बिनविरोध निघण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.
शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गोपीनाथ घुमरे यांना मदानात उतरवले, तर भाजपकडून मनोज पाटील आणि काँग्रेसकडून नवनाथ थोटे, तर अपक्ष म्हणून दत्ता प्रभाळे, प्रेमनाथ तायड व दत्ता नरनाळे हे ६ उमेदवार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी आघाडीला या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचे उमेदवार थोटे यांना पाठिंबा देण्याची वेळ आली. त्यामुळे भाजप, शिवसंग्राम आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांत तिरंगी लढत होईल, असे चित्र आहे. शिवसंग्रामचे उमेदवार घुमरे यांच्या प्रचारार्थ आमदार विनायक मेटे, तर काँग्रेस आघाडीचे थोटे यांच्या प्रचारार्थ तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मंगळवारी प्रचाराचा नारळ वाढविला.