News Flash

सहकारमंत्री देशमुखांच्या उपस्थितीत ‘तिरंगा यात्रा’

मराठवाडय़ातील २१ कारखाने अवसायनात निघालेले आहेत.

औरंगाबादेत मोठी गर्दी, सेबीने ठेवलेला ठपका मान्य

साखर कारखान्यासाठी प्रतिदिन ४९ सभासद करून त्यांच्याकडून ७४ कोटी ८३ लाख रुपयांचे रोखे बेकायदा घेतल्याच्या प्रकरणात अडकलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपने ‘तिरंगा यात्रा’ काढली. औरंगाबाद शहरातील तीन विधानसभा क्षेत्रांत साडेतीन तासांहून अधिक वेळ त्यांनी या यात्रेसाठी दिला. ‘‘सेबी’ने ठेवलेला ठपका मान्य असून सभासद शेतकऱ्यांचे पैसे परत केले जातील,’ असे त्यांनी यात्रेनंतर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. देशमुख यांच्यावरील आरोपानंतर औरंगाबादमध्ये त्यांच्या उपस्थितीत काढलेल्या तिरंगा यात्रेला मोठी गर्दी होती.

मराठवाडय़ातील २१ कारखाने अवसायनात निघालेले आहेत. या कारखान्यांची आर्थिक स्थिती तपासून आवश्यकता भासली तर कर्ज फेडण्यासाठी जमिनींची विक्री केली जाईल, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. आजारी कारखान्यांपैकी मराठवाडय़ातील किमान दोन कारखाने तरी या वर्षी पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्य़ात लोकसमूह उद्योगसमूहाचा दबदबा आहे. मात्र, सेबीच्या कारवाईबाबतची माहिती औरंगाबादहून कशी आली, याविषयी लोकमंगलमध्ये तर्क-वितर्क लढविले जात होते. त्याचाच एक भाग म्हणून सुभाष देशमुख शुक्रवारी औरंगाबादेत आले होते.

जिल्हा बँकांची स्थिती वाईट असली तरी त्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने योग्य ती पावले टाकली जातील, असे त्यांनी सांगितले. मात्र, मराठवाडय़ातील जिल्हा बँका या साखर कारखान्यांमुळे अडचणीत आल्या आहेत. याकडे लक्ष वेधले असता देशमुख म्हणाले की, हे खरे आहे.

साखर कारखान्यांमुळे बँका अडचणीत आल्या आहेत. मात्र, कारखाने सुरू व्हायला हवेत. ऊस या एकमेव पिकाला चांगला भाव असतो. त्याने शेतकऱ्यांची उन्नती होते. त्यामुळे साखर कारखानदारीला प्रोत्साहन दिले जाईल. मराठवाडय़ातील सर्व कारखाने सुरू व्हावेत यासाठी त्यांच्या जमिनीची विक्रीदेखील करता येऊ शकेल. मात्र, तो शेवटचा पर्याय असेल. काही कारखाने भाडेतत्त्वावर देता येतील का, याची चाचपणी केली जात आहे. साखर कारखाने आणि पाणी वापर यावर वाद असले तरी हे प्रमुख पीक असल्याने या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फायद्यात असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडील रक्कम अन्य व्यवसायांमध्ये गुंतवता येऊ शकते काय, याचीही चाचपणी केली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ात बाजार समितीकडे साडेपाच कोटी रुपये शिल्लक असल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकारमंत्र्यांना सांगितले. अशा रकमा कोल्ड स्टोरेज व शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरता येऊ शकतील काय, हे तपासणार आहोत, असे देशमुख यांनी सांगितले.

चांगल्या मार्गाने पैसे कमवून मी राजकारणात आलो आहे. राजकारण हा माझा ‘धंदा’ नाही. लोकमंगलमधील कर्ज प्रकरण हा घोटाळा नाही

-सहकारमंत्री सुभाष देशमुख

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2016 1:46 am

Web Title: bjp subhash deshmukh movement in aurangabad
Next Stories
1 मूग डाळीचे भाव गडगडले
2 खासदार पवारांना विश्रांतीचा सल्ला मराठवाडय़ातील नियोजित कार्यक्रम रद्द!
3 रसायनाच्या स्फोटात महिला ठार; स्फोटाचे कारण अस्पष्ट
Just Now!
X