News Flash

लातूरमध्ये काँग्रेसला भाजपचे कडवे आव्हान

संख्याबळ टिकवण्याचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

आयात उमेदवारांमुळे भाजपला आशा: काँग्रेसची भिस्त देशमुखांच्या करिश्म्यावर; संख्याबळ टिकवण्याचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

नगरपालिका निवडणुकीच्या यशानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश मिळावा म्हणून विविध राजकीय पक्षांतील मंडळी रांगा लावत असतानाच काँग्रेसच्या जहाजातून उडय़ा मारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी अहमदपूरचे नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसह भाजपात प्रवेश केल्यामुळे अहमदपूर पालिकेत आता भाजपाचे पूर्ण बहुमत आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संभाजी पाटील यांनी शिरूर अनंतपाळ नगरपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरपंचायत सदस्यांसह भाजपात प्रवेश केल्यामुळे ही नगरपंचायत आता शंभर टक्के भाजपाची झाली आहे. एकही सदस्य विरोधी पक्षाचा या नगरपंचायतीत नाही.

निलंगा, उदगीर व अहमदपूर या तीन पालिका भाजपच्या ताब्यात आहेत, त्यामुळे आता नवीन राजकीय समीकरणे भाजपाच्या लाभाची आहेत. मावळत्या जिल्हा परिषदेत ५८ सदस्यांपकी ३५ सदस्य एकटय़ा काँग्रेसचे आहेत. भाजपा आठ, शिवसेना सहा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ सदस्य आहेत. या स्थितीत आता मोठा बदल होऊन ४० पेक्षा अधिक सदस्य भाजपाचे निवडून यावेत यासाठी भाजपाने व्यूहरचना आखली आहे. भाजपासाठी अच्छे दिन असल्यामुळे निवडणुकीतील यश हे भाजपासाठी केवळ दशांगुळे उरले आहे. औसा, लातूर व रेणापूर हे तीन तालुके वगळता काँग्रेसचे अन्य ठिकाणी अस्तित्वही राहील की नाही इतक्या आक्रमकपणे भाजपाने प्रचारमोहीम राबवण्याचे ठरवले आहे. अर्थात नवीन मंडळी पक्षात आल्यामुळे जुन्या निष्ठावान इच्छुक कार्यकर्त्यांचे काय होणार? नव्यांना संधी दिली तर निष्ठावान बंड करतील व जुन्यांना संधी दिली तर नव्यांना प्रवेश कशासाठी दिला? असे प्रश्नही निर्माण होणार आहेत.

निष्ठावंत अस्वस्थ

खासकरून अहमदपूर तालुक्यातील आमदारांच्या प्रवेशामुळे महिनाभरापूर्वीच अतिशय जिद्दीने नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. अहमदपूर व चाकूर तालुक्यात अगोदरच भाजपाकडे नेत्यांची संख्या मोठी आहे. यात नव्याने आमदारांची भर पडल्यामुळे तलावात घागरभर पाणी ओतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी भाजपाला निवडणुकीसाठी उमेदवार शोधावे लागत होते. आता सर्वाधिक उमेदवारांची गर्दी भाजपाकडे असल्यामुळे नाराजांची संख्या मोठी होण्याची शक्यता आहे. यावर मात करून निवडणुकीत विजय मिळवण्याकडे भाजपाचा कल आहे.

लातूर तालुक्यातील एकुर्गा जिल्हा परिषद मतदारसंघात विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या िरगणात उतरणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित असल्यामुळे धीरज देशमुख हे अध्यक्षपदाचे दावेदार असतील. त्यांना त्या मतदारसंघात रोखण्यासाठी भाजपाने जिल्हा परिषद निवडणुकीच्या जिल्हय़ाच्या प्रचाराचा शुभारंभ शक्तिप्रदर्शन करत एकुग्र्यातून केला आहे. ही चाल खेळत भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात जाऊन काँग्रेसला ललकारण्याचे धाडस दाखवले आहे.

काँग्रेसचे सामूहिक नेतृत्व

काँग्रेसने बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ातील अनेक निवडणुकांचा अनुभव असलेले व निवडणुकीतील खाचखळगे, डावपेच माहीत असलेले अमदार दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर व माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे अतिशय ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या िरगणात न उतरवता त्यांचे आवश्यक ते मार्गदर्शन घेऊन आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार बसवराज पाटील मुरुमकर या तिघांच्या खांद्यावर प्रामुख्याने जिल्हय़ाची धुरा दिली जाणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत गेल्या पाच वर्षांच्या काळात जे काम झाले आहे त्याचा लाभ काँग्रेस पक्षाला होईल असा कयास जि. प. अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर व माजी आ. शिवाजी पाटील कव्हेकर यांचा आहे. सामूहिक नेतृत्वाच्या आधारे निवडणूक लढवली गेली तर पुन्हा एकदा काँग्रेसला यश मिळेल असा दावा काँग्रेसमधील मंडळी करत आहेत.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही मंडळींनी काँग्रेस पक्षातून अन्य पक्षांत प्रवेश घेतला असला तरी त्यांच्यासोबत मतदार जातील अशी सुतराम शक्यता नसून जनता आता अतिशय हुशार बनली आहे. संधिसाधू मंडळींना मतदार मतपेटीतून जागा दाखवून देतील. नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या समस्या व अनेक प्रश्न सामान्य माणसाला भेडसावत आहेत, त्यामुळे जि. प. निवडणुकीत काँग्रेसला हमखास यश मिळेल. जि. प. स्थापनेपासून काँग्रेस सत्तेत आहे. ही सत्ता अबाधित राहील, असा दावा आमदार अमित देशमुख करत आहेत.

आघाडीची बोलणीच नाही

  • जिल्हा परिषदेत काँग्रेसने राष्ट्रवादीला सोबत घेतले तर त्याचा निवडणुकीत लाभ होऊ शकतो, मात्र कोणी कोणाला बोलायचे या अहंकारामुळे बोलणीला प्रारंभ होत नाही.
  • राष्ट्रवादीची ताकद अगदीच नगण्य असल्याचा दावा काँग्रेसची मंडळी करत आहेत, तर काँग्रेस आपल्याच तोऱ्यात वावरत असल्याचा राग राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, त्यामुळे दोघांचेही ‘एकला चलो’ धोरण ठरण्याची शक्यता आहे. मताच्या फाटाफुटीचा लाभ विरोधकांना होण्याचा संभव अधिक आहे.

शिवसेनेला चच्रेत गुंतवण्याची खेळी

  • नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती केली असती तर दोघांनाही अधिक लाभ झाला असता, अशी भूमिका भाजपाची मंडळी मांडत आहेत.
  • जिल्हा परिषदेत युती नक्की होईल असे एकीकडे सांगत दुसरीकडे स्वबळावरच अधिक भर असल्यामुळे शिवसेनाही भाजपाच्या खेळीला चोख उत्तर देण्याच्या तयारीत आहे.
  • आमची भूमिका युती व्हावी अशी आहे. आमची ताकद तुलनेने कमी असली तरी हत्तीच्या कानात मुंगी गेल्यानंतर काय होते याचा अनुभव पुन्हा एकदा दाखवण्याची शिवसेनेची तयारी असल्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 1:34 am

Web Title: bjp vs congress party in maharashtra municipal elections
Next Stories
1 गिरीश कुबेर यांना स. मा. गग्रे पुरस्कार
2 सरकारचे शेतीविरोधी धोरण बदलायला हवे
3 केंद्रीय उत्पादन शुल्कात नोटबंदीनंतर वाढ
Just Now!
X