News Flash

औरंगाबादमध्ये महापौरपदी भाजप पुन्हा दावा सांगणार

लोकसभा निवडणुकीची रणनीती

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

लोकसभा निवडणुकीची रणनीती

औरंगाबाद महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीमध्ये शिवसेनेला झटका देण्यास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अनुकूल असल्याने राजकीय हालचालींना येत्या दोन दिवसात वेग येईल. लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवायची असल्याने त्या तयारीच्या पाश्र्वभूमीवर हा झटका देण्याची रणनीती आखली जात आहे. पुढील आठवडय़ात निवडी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जरी महापौर- उपमहापौर पदाबाबतचा करार पाळण्याबाबतचे आदेश दिले असले तरी पुढील निवडणुकांची रणनीती म्हणून भाजप महापौरपदासाठी पुन्हा दावा करणार आहे. त्यासाठी आवश्यक ते संख्याबळ मिळविण्यासाठी खास प्रयत्न केले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद, नांदेड व परभणी या मतदारसंघात भाजपचे लोकसभेचे उमेदवार कोण, याची चाचपणी करण्यासाठी महिंद्रसिंग यांना नुकतेच पाठविण्यात आले होते. भाजपच्या विविध संघटनांचे कोणते पदाधिकारी हजर राहतात, कोण संघटनात्मक कामांकडे दुर्लक्ष करतो, याचा अहवाल देखील तयार केला जात आहे. सर्व मतदारसंघात भाजपला उमेदवार द्यायचा असेल तर त्याची तयारी महापालिकेतून केली जावी, अशी रणनीती आखली जात आहे.

पुढील निवडणुकीतील यशासाठी शिवसेनेला आतापासून झटका मिळाला तरच लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा लाभ होईल, अशी मांडणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चेत आली. त्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अनुकूल असल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्तास भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकून यांनीही दुजोरा दिला. ‘अद्याप, कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, सर्व मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल, अशी रचना करण्याची सुरुवात केली आहे’, असे ते म्हणाले.

‘युतीचा करार वरच्या स्तरावर झाला होता. अजून कोअर कमिटीची बैठक झालेली नाही. या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप आपल्यापर्यंत कोणत्याही सूचना आल्या नाहीत,’ असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. महापौर निवडीबाबतचा निर्णय लोकसभा निवडणुकीशी जोडून पाहिला जात असल्याने भाजप महापौरपदावर पुन्हा दावा सांगेल, अशी रणनीती आखली जात आहे.

दीपावलीनंतर त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. भाजपची राज्याची कोअर कमेटीची बैठक लवकरच होणार आहे. त्यामध्ये या अनुषंगानेही चर्चा होण्याची शक्यता आहे. याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारबाबतची चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 12:58 am

Web Title: bjp vs shiv sena in aurangabad 2
Next Stories
1 एसटी संपातून शिवशाही, वायफायच्या निर्णयाविरुद्ध संताप
2 औरंगाबाद : एसटीची रिक्षा आणि चारचाकी गाडीला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
3 औरंगाबाद: कचरा डेपो विरोधातील आंदोलन स्थगित
Just Now!
X