जिल्ह्यत नगरपालिका निवडणुकीचा फड तापला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून स्वबळावर निवडणुका लढविण्याचा नारा दिला जात आहे. भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना आपल्या पक्षाची ताकद माहीत आहे. भाजपा आमचा शत्रू नंबर एक.. असे भोईर म्हणाले, हे त्यांच्या बालिशपणाचे विधान असल्याचे मत पालकमंत्री कांबळे यांनी व्यक्त केले. वास्तविक दोन्ही पक्षांना निवडणूक युती हवी आहे. परंतु या नेत्यांच्या शब्दयुध्दात मात्र निवडणूक युतीचा ‘अडला नारायण..’, असे चित्र असल्याचे पहावयास मिळते.

नगरपालिकेच्या निवडणुकीने आता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जिल्ह्यात तीन नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा शिवसेना हे प्रमुख पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागले आहेत. काँग्रेस पक्षांतर्गत खासदार राजीव सातव व माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यात बेबनाव असल्याने या दोन नेत्यांच्या गटबाजीत पक्ष कार्यकत्रे संभ्रमावस्थेत होते. परंतु दोन दिवसांपूर्वी सातव व गोरेगावकर यांच्यात दिलजमाई झाली. हिंगोलीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत या दोन नेत्यांनी घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून कधी नाही ते यावेळी १४५ इच्छुक उमेदवारांनी काँग्रेसकडून मुलाखती दिल्या आहेत. या दोन नेत्यांचा बेबनाव संपुष्टात आल्याने कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून नगरपालिकेची सत्ता सांभाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र त्यांचे दोन नगरसेवक भाजपात तर नगरसेवक निहाल अहेमद काँग्रेसमध्ये गेल्याने या पक्षाला गळती लागली आहे. आणखी काही नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी पत्रकारांच्या बठकीत केले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीकडे उमेदवारांची संख्या असली तरी सत्ता राखण्यासाठी या पक्षातील नेत्यांना जिवाची पराकाष्टा करावी लागणार, असेच चित्र आहे.

यावेळी जनतेतून सरळ नगराध्यक्षाची निवड होणार आहे. तसेच राज्यात सत्तांतर झाल्याने या निवडणुकीत वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु राज्यात भाजप शिवसेनेची युती असताना या दोन्ही पक्षातील नेत्यांनी स्वबळाचा नाराच दिल्याने शिवसेनेतील कार्यकत्रे आनंद व्यक्त करीत आहेत. कारण यापूर्वी भाजपा-शिवसेनेची निवडणूक युती होत गेल्याने इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार असल्याने अशा कार्यकर्त्यांचा युतीला सक्त विरोध असल्याने भाजप-सेना युती होऊ नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना आपल्या ताकदीची कल्पना आहे. परंतु स्वबळाच्या नाऱ्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होत असला तरी नेत्यांना मात्र सन्मानपूवर्क युती हवी आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हिंगोलीत पूर्वी झालेल्या एका पत्रकारांच्या बठकीत शिवसेना छटाकभर पक्ष असल्याचे मत व्यक्त करणारे पालकमंत्री कांबळे आज इच्छुक उमेदवारांची गर्दी असल्याचे पत्रकार परिषदेत सांगत असले तरी आम्ही कोणाला निरोप देणार नाही, आमचे दरवाजे उघडे असल्याचे मत मांडतात. यामागे निश्चितच त्यांना युतीची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हिंगोलीत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकर्त्यांची बठक झाली. कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवसेनेसाठी मित्र पक्षच सर्वात मोठा शत्रू असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील तीनही नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला चारीमुंडय़ा चित करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, जिल्ह्यात कोणत्या पक्षाची ताकत आहे? हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिष्याची गरज नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले होते.

रविवारी पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या झालेल्या बठकीत भोईर यांच्या विधानावर हा त्यांचा बालिशपणा असल्याने नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारच चारी मुंडय़ा चित करून त्यांना त्यांची जागा दाखविल, असे मत व्यक्त केले असले तरी दोन्ही पक्षांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिनांकापर्यंत निवडणूक युती होईल व त्यासाठी नेते प्रयत्न करतील, असे बोलले जात आहे. परंतु आज निवडणुकीचा फड मात्र कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने भाजप-शिवसेना नेत्यांच्या शब्दयुध्दावरून ‘अडला नारायण..’, असेच चित्र निर्माण झाल्याचे पहावयास मिळते.