भाजप जिल्हा परिषद सदस्यांचा सवाल

औरंगाबाद : राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना-भाजपची युती घोषित केली आहे. मात्र औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेना-काँग्रेस अशी अभद्र युती आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात युतीचा प्रचार करताना शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना मते द्या, असे सांगण्यासाठी दारोदार फिरलो तर मतदार जिल्हा परिषदेत काँग्रेस सत्तेत कशी, असा प्रश्न करतील. त्यामुळे सेना खासदारांचा प्रचार कसा करायचा, असा प्रश्न करीत जिल्हा परिषदेतील भाजपच्या सदस्यांनी शिवसेनेवर काँग्रेससोबतची युती तोडण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब केला.

सुभेदारी विश्रामगृहावर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड, शिवाजी पाथ्रीकर, मधुकर वालतुरे गुरुजी, पुष्पाताई काळे आदींसह सदस्यांनी मंगळवारी पत्रकार बैठक घेऊन शिवसेनेकडून दोन वर्षांत निधी वाटपातून झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. या वेळी सदस्यांनी सांगितले, की शिवसेना व भाजपची युती २५ वर्षांपासून आहे. मात्र मध्यंतरी युती तुटल्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी झालेला असताना शिवसेनेने काँग्रेससोबत घरोबा करून सत्ता हस्तगत केली. या दोन वर्षांत निधी वाटपात प्रचंड अन्याय केला.

शिवसेनेकडून भाजप सदस्यांना सापत्न वागणूक मिळाली. जनसुविधेच्या कामासाठी वाटप होणाऱ्या निधीच्या यादीत भाजप सदस्यांना डावलण्यात आले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपासाठीची यादी दिली ती काँग्रेस व शिवसेना सदस्यांची. या यादीतून भाजप सदस्यांना डावलण्यात आल्याचा आरोप एल. जी. गायकवाड यांनी केला. यादीवरून प्रसंगी आपण न्यायालयातही जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार अडचणीचा ठरणार आहे. लोकांपुढे कसे जायचे, असा प्रश्न भाजप सदस्यांना पडला आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती शिवसेनेने तोडली तर जिल्हय़ातील ९ पंचायत समित्यांपैकी ५ समित्या भाजप-शिवसेनेच्या ताब्यात येतील, असेही या वेळी सांगण्यात आले. खासदार खैरेंचा प्रचार करताना अडचणी येणार असल्यातरी युतीचा धर्म म्हणून आणि वरिष्ठांचा आदेश मानून प्रचार करू, मात्र त्यासाठीचे मनोबल आमच्याकडे नसल्याचेही सदस्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्हा परिषदेतील शिवसेना-काँग्रेस युती तोडण्याबाबतच्या मुद्यावरून सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना संपर्क केला असता ते एका धार्मिक कार्यक्रमात असल्याचे समजले.

खासदार पुडीवरून निवडूनही येतील

चंद्रकांत खैरे यांना पुडी व मंत्रोच्चाराने आजार बरे करण्याची कला अवगत आहे. याच पुडीवरून कदाचित ते निवडूनही येतील, अशा उपहासात्मक शब्दांत भाजप सदस्य शिवाजी पाथ्रीकर यांनी खासदारांना टोला लगावला.