22 January 2018

News Flash

BLOG: थेट सरपंच निवड; गल्लीत ‘गोंधळ’ दिल्लीतून ‘मुजरा’ !

कोणत्याही पक्षाचा प्रभाव नाही

आप्पासाहेब शेळके, औरंगाबाद | Updated: October 11, 2017 2:07 PM

प्रातिनिधीक छायाचित्र

मकरंद अनासपुरेच्या अभिनयाने साकार झालेला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटाचा दुसरा भाग राज्याच्या राजकारणात सुरु असून गल्लीतल्या ‘गोंधळाला’ दिल्लीतून ‘मुजरा’ आल्याची चर्चा ग्रामपंचायतींच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे.  राज्याच्या ग्रामविकास मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील महत्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यात ७० टक्के ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यात यश आल्याचा दावा भाजपनं केलाय. तर याच ठिकाणी राष्ट्रवादीकडूनही ८० टक्के विजयाचा दावा केला जातोय. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर झाल्या नसल्यानं एखाद्या पक्षाच टक्केवारीत यश मोजणे कठीण आहे. हे चित्र फक्त परळी तालुक्याचं नाही, तर राज्यभरात हीच स्थिती आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते ‘मै बडा’ हे सांगण्यात व्यग्र आहेत. सोशल मीडियावर, पत्रकार परिषद घेऊन दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पक्ष नेतृत्वाने केलेल्या वक्तव्यामुळे गावच्या पारावर सध्या सर्व पक्षाचे समर्थक आपापल्या पक्षाच्या फुशारक्या मारत आहेत.

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत बसून त्यांच्या ‘अधिकृत’ ट्विटरच्या माध्यमातून नंदुरबारपासून वाशिम जिल्ह्यापर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने निर्विवाद यश मिळवल्याचा दावा केला. त्यांनी ट्विटरवरुन यशाची आकडेवारी मांडली. मात्र या आकडेवारीतही सावळा गोंधळ दिसून येतो. सोमय्यानी दिलेल्या आकडेवारीनुसार नंदूरबार जिल्हयातील निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचयतीची संख्या ५१ आहे. यात ३१ जागा मिळाल्याचा दावा सोमय्यांनी केला. यात काँग्रेस १९, शिवसेना २, राष्ट्रवादी १, अपक्ष १ आणि माकप १ अशी आकडेवारी त्यांनी दिली. या आकडेवारीचा ताळमेळ जूळत नाही. निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या ५१ असताना त्यांनी दिलेल्या जागाचा आकडा हा ५५ ची संख्या गाठतो.  मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. २१२ पैकी २२८ ग्रामपंचायती सर्वपक्षानी जिंकल्याचा दावा करण्यात येत आहेत. अर्थात दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व दाखवलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमी प्रमाणे ट्विटरवरून भाजपच्या यशाचं अभिनंदन केलं. मोदींनी ट्विटरवरून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. ‘ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे आभार,’ असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्याच्या जनतेसोबतच मोदींनी महाराष्ट्र भाजपचेही कौतुक केले. ‘ग्रामीण भागातील जनता, शेतकरी, तरुण आणि गरिबांचा भाजपला पाठिंबा असल्याचे निकालातून दिसले. लोकांचा भाजपच्या विकासाच्या धोरणाला पाठिंबा आहे, हेच हा विजय दर्शवतो,’ असा उल्लेख मोदींनी ट्विटमध्ये केलाय.

ग्रामपंचायत निवडणूक, मोदींचा दावा आणि भाजपचा विकास आराखडा याबाबत गावागावांतील नागरिकांचं काय मत आहे. हे तपासण्यासाठी ज्या गावात भाजप पुरस्कृत सरपंच निवडून आले त्या गावातील नागरिकांशी संवाद साधला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव ग्रामपंचायतीवर भाजप पुरस्कृत उमेदवार असलेले कैलास जाधव (पाटील ) ३५१ मताधिक्याने विजयी झालेत. त्यांच्याच गावातील संतोष गित्ते हा तरुण औरंगाबदेत स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मतदानाच्या दिवशी गावाकडं जाऊन त्यानं मतदानाचा हक्क बजावला. मतदान करताना उमेदवार पाहून मतदान करतो, पक्ष नाही, असे तो म्हणाला. कैलास पाटील यांचा गावातला वावर चांगला आहे. गावात कोणाला मदतीची गरज असेल, तर तात्काळ ते हजर असतात. शिवाय गावाच्या विकासासाठीचं व्हिजन त्यांच्याकडं आहे. म्हणून त्यांची निवड केल्याचं त्यानं रोखठोकपणे सांगितलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी राबवलेल्या योजनांचा कोणताही प्रभाव ग्रामपंचायत निवडणुकीत नाही, असेही त्याने सांगितले. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणारी भरती प्रक्रिया धीमी झाल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

बुलढाणा जिल्हयातील सिंधखेडराजा तालुक्यातील झोटिंगा-आगेफळ येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीवर विजय डिगोळे यांची सरपंचपदी निवड झाली. डिगोळे भाजपचं काम करतात. मात्र ते भाजपचे म्हणून त्यांना निवडून दिल असं नाही. तर शिकलेल्या तरुणाच्या हाती गावचा कारभार असावा. गावात एकोपा रहावा. म्हणून निवडणूक बिनविरोध पार पडल्याचं झोटिंगा गावचे रहिवाशी शिवहरी वाघ सांगतात. गावच्या निवडणुकीबद्दल वाघ म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष म्हणून मतदान केलं जात नाही, तर व्यक्ती पाहून संधी दिली जाते. सध्या सोयाबीनला भाव नाही. सरकारनं केलेल्या कर्जमाफीची अंमलबाजवणी झालेली नाही. भारनियम सुरु आहे. त्यामुळं जनता भाजपला कशाला मतदान करेल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कुठल्याही पक्षाचा गावच्या निवडणुकीत संबंध नाही, असेही ते म्हणाले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी गावची ग्रामपंचायत निवडणूक १६ ऑक्टोंबरला होणार आहे. या गावात सरपंचपदासाठी भाजपच्या दोन गटांनी वेगवेगळे उमेदरवार रिंगणात उतरवले आहेत. दोघांना पडणारी मतं ही पक्षाला पडली म्हटलं तर हस्यास्पद होईल. असं भाजप कार्यकर्त्यांकडूनचं म्हटलं जातंय. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद निवडणुकीत आम्ही पक्ष बघून मतदान करतो. तेच समीकरण गावात लागू होत नसल्याचे पहिल्यांदाच थेट जनतेमधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंचाचही मत आहे. या निवडणूक निकालाचा भाजपने जो अर्थ काढला तो म्हणजे ‘ गल्लीत गोंधळ दिल्लीतून मुजरा’ असाच काहीसा प्रकार आहे.

First Published on October 11, 2017 1:36 pm

Web Title: bjps claim of winning the election the truth is different
  1. No Comments.