बेळगावसह इतर मराठी भाषक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि. १) बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येत आहे. या वेळी येथे आयोजित कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुनराव खोतकर उपस्थित राहणार आहेत.
रविवारी बेळगावला काळा दिन पाळण्यात येणार असून त्यानिमित्त आयोजित सायकल फेरीत आमदार खोतकर सहभागी होतील. १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषक भाग व ८१४ गावे कर्नाटक घुसडण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. १९५६ पासून मराठी भाषकांवर कर्नाटकात राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. तेव्हापासून या भागातील मराठी भाषक जनता महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. १९४६ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत झाला आणि त्याच वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. १९४६ ते १९५१ या सहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भव्य परिषदा घेऊन बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे ठराव संमत करण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतु त्यात बेळगावसह सीमा भाग समाविष्ट केला नाही. सीमा भागातील मराठी भाषकांवर अन्याय करण्यात येत आहे. बेळगावचे नामकरण ‘बेलगामू’ असे करण्यात आले. बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत केला म्हणून तेथील तत्कालीन महापौरास कर्नाटकतील महाराष्ट्रविरोधी मंडळीच्या रोषास पात्र व्हावे लागले. सीमावासीयांच्या या लढय़ात शिवसेना कायम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सोबत राहिली आहे.