गेल्या दोन वर्षांपासून कापसाने शेतकऱ्यांची केलेली निराशा या पाश्र्वभूमीवर या वर्षी कापसाच्या भावात वाढ व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असली, तरी कापसाचे कमी झालेले क्षेत्र आणि घटलेले उत्पादन यामुळे यंदाही कापूस बाजार काळवंडलेलाच राहील, अशी चिन्हे आहेत. अजून सरकारी खरेदी सुरू झाली नसली, तरी खासगी व्यापाऱ्यांमार्फत होणाऱ्या खरेदीने गुरुवारी परभणीत ४ हजार २८० रुपये क्विंटल हा आकडा गाठला.
सरकारने २०१५-१६ या हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला ३ हजार ८०० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ४ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला. खासगी व्यापारी मात्र या वर्षी या दरापेक्षा २०० रुपये चढा भाव देत आहेत. गुरुवारी परभणीत खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची ४ हजार २८० रुपये दराने खरेदी झाली. अन्य तालुक्यांच्या ठिकाणीही खासगी व्यापाऱ्यांमार्फतच कापसाची खरेदी झाली. राज्य कापूस एकाधिकार योजनेच्या खरेदीला अजून सुरुवात झाली नाही. बऱ्याचदा एकाधिकारची खरेदी सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या फरकाने ‘सीसीआय’ची खरेदी सुरू होते. व्यापारी आणि सीसीआय यांच्यातील चढाओढीचा फायदाही कधी कधी शेतकऱ्यांना होतो. पण सीसीआयने चढा दर देऊ नये, या साठी व्यापाऱ्यांमार्फत संघटित दबाव टाकण्याचेही प्रयत्न होतात. या वर्षी अजून तरी कापूस एकाधिकार खरेदीला प्रारंभ झाला नाही. सीसीआयसुद्धा खरेदीसाठी मदानात लवकरच उतरेल, अशी स्थिती नाही. विशेष म्हणजे यंदा कापूस हंगाम अवघ्या दीड महिन्यात आटोपणार असल्याने कापूस खरेदीची प्रक्रिया फार उशिरापर्यंत चालणार नाही.
परभणी हा कापूस उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहणारा जिल्हा. गेल्या दोन वर्षांत कापसाचे उत्पादन घटलेच आहे. या वर्षी तर खरीप हंगामही हातचा गेला. परिणामी कापसालाही त्याचा फटका बसला. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले. दरामुळे कापसाची मोठी परवड होईल, असे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांना किमान ५० क्विंटल कापूस झाला, अशा शेतकऱ्यांना १० क्विंटलही  कापूस होणार नाही, असे चित्र आहे. पावसाने ताण दिल्याने कापसाची वाढ खुंटली. दुबार पेरणीनंतरही शेतकऱ्यांना कापसाने दगा दिला. दुबार पेरणीला उशीर झाल्याने पावसाची सर्व नक्षत्रे संपून गेल्यानंतर कापसाचे भवितव्य पुन्हा टांगणीला लागले. पाऊसच नसल्याने कापसाची उंची खुरटली. झाडांची वाढ झालीच नाही. जेथे एका झाडाला ८० ते १०० बोंडे लागायची, तेथे आता कुठे १०-१५, तर कुठे २०-२५ बोंडे आहेत. पावसाने ताण दिल्याने जो काही कापूस नापिकीतून वाचला तो आता फुटला आहे. वेचणीला आलेल्या या कापसाचा या वर्षी शेतकऱ्यांना फारसा दिलासा मिळणार नाही.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३७ हजार १७८ हेक्टरची घट झाली. जिल्ह्यात १ लाख ६६ हजार हेक्टर कापूस लागवड झाली. त्यामुळे या घटलेल्या लागवडीबरोबरच उत्पादन खर्चाचा ताणही शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. कापूस विक्रीच्या पशातून उत्पादन खर्च आणि वेचणीची बरोबरीही होण्याची शक्यता दिसत नाही. लावलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहे.