12 December 2017

News Flash

‘वाचा’ सौख्यभरे!; आहेर, कन्यादानात पुस्तकांची भेट

लग्नात पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम संपन्न

औरंगाबाद | Updated: June 19, 2017 11:59 AM

औरंगाबादमध्ये अनोखा विवाह सोहळा संपन्न

लग्न म्हटलं की बडेजाव आला, पैशांची उधळपट्टी आली आणि डीजेच्यावर तालावर थिरकणारी तरुणाईदेखील आली. अनेक ठिकाणी लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च करुन श्रीमंतीचं प्रदर्शन केलं जातं. पैशांचं ओंगळवाणं दर्शन घडवणारे अनेक विवाह सोहळे आज काल पाहायला मिळतात. मात्र औरंगाबाद शहरात एक असा विवाह सोहळा पार पडला, जिथं रुखवताची जागा पुस्तकांनी घेतली होती. इतकंच काय तर आहेर आणि कन्यादानही पुस्तकांनीच करण्यात आलं.

उद्योजक, अभियंता आणि अर्थविषयक अभ्यासक असलेल्या डी. एस. काटे यांची मुलगी सायली आणि सूर्यकांत पवार यांचा मुलगा अजिंक्य यांचा हा विवाह सोहळा होता. संसाराचं अर्थकारण समजून घेण्याच्या अगोदर सायली आणि अजिंक्य यांनी ‘अर्थजागर’ केला. काटे यांनी लिहिलेल्या ‘अर्थजागर’ पुस्तकाचं प्रकाशन या विवाह सोहळ्यात करण्यात आलं. लग्नात असा कार्यक्रम पार पडण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. मुलीचे वडील डी. एस. काटे यांच्या संकल्पनेला वर पक्षाकडील मंडळींनी पाठिंबा दिला. म्हणून भांडेकुंडे सासरी घेऊन न जाता सायली पुस्तक घेऊन माहेरी जात आहे. आपली सून ज्ञानाचा संस्कार घेऊन येत असल्यामुळे तिचे सासरे सूर्यकांत पवार आनंद व्यक्त केला. घरातील वडिल मंडळींनी घेतलेल्या निर्णयाला अजिंक्य आणि सायलीने पाठिंबा दिला. त्यामुळे लग्न समारंभात पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळाले. पुस्तकाचं प्रकाशन करून हा सोहळा पार पडला. शिवाय गरजू वाचनालयाला भेट म्हणून पुस्तकं देण्यात आली.

वधू, वर आणि त्यांच्याकडील मंडळींप्रमाणेच लग्नाला आलेले व्हराडी या कल्पनेनं भारावलेले होते. आहेराच्या रकमेत त्यांना पुस्तक खरेदी करायची होती. ‘हा अभिनव विवाह सोहळा चळवळ ठरावा’, असं मत यमाजी मालकर त्यांनी व्यक्त केलं आणि वधूवरांना पुस्तकरुपी आशीर्वाद दिले. पुस्तक विक्रेत्यांना लग्नात खास जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. विशेष म्हणजे कोणताही मोबदला न घेता पुस्तक विक्रेत्यांना लग्न मंडपात जागा देण्यात आली होती. त्यामुळे हा अभिनव प्रयोग पुस्तक विक्रेत्यांना चांगलाच भावला.

आयुष्यातील गणित सोडवायची असतील तर पुस्तकं महत्वाची आहेत. त्यामुळे यापुढे असेच विवाह पार पडावेत, अशी इच्छा पुस्तक खरेदी करणाऱ्यांनीदेखील व्यक्त केली. ‘आपल्या आसपास अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी अशाच कल्पक विचारांची गरज आहे’, अशी भावना लग्न समारंभात सहभागी झालेल्या अनेकांनी व्यक्त केली.

First Published on June 19, 2017 11:59 am

Web Title: book publishing program in aurangabad marriage groom bride gifts books to guest