तुळजापूरहून रायपूरला साखर घेऊन निघालेला ट्रक चाकूर तालुक्यातील लातूर रोड येथील रेल्वे उड्डाणपुलावर खड्डे चुकवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने सरळ पुलावरून खाली घसरत येथील समृध्दी किराणा दुकानाच्या शटरवर आदळला. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारस ही घटना घढली. लातूर – नांदेड रस्ता हा खड्डय़ासाठी कुप्रसिध्द झाला आहे. विविध संघटनांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे वेळोवेळी निवेदन दिले असून आंदोलनही केले आहे.
घटनेच्या वेळी कोणीही नागरिक तेथे नसल्याने जीवितहानी झाली नाही. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने जागोजागी सिमेंट काँक्रीटचे दगड उभे करून ठेवण्यात आले आहेत. त्यातील काही दगडांना हा ट्रक अडकल्याने तो किराणा दुकानात अधिक प्रमाणात घुसला नाही. मात्र, दुकानाचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, यासोबतच ट्रकचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. साखरेचा ट्रक उड्डाणपुलावरून खाली कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. मात्र, या घटनेतून तरी प्रशासनाला जाग यावी अशी संतप्त प्रतिक्रिया येथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.