बिपीन देशपांडे

‘लोकांनी घरात बसावे, त्यांचे व्यावसायिक वा वैयक्तिक काम सुरळित सुरू राहावे म्हणून एखाद्या उंच इमारतीवरील छतावर लोखंडी गजांच्या जोडणीतून उभारण्यात आलेला मोबाइलचा मनोरा ४० अंशांवरील तापमानात चढायचा. हाताला चटके सोसत मनोऱ्यावरील उपकरणांची दुरुस्तीची कामे आमच्याकडून सुरू आहेत.’ हे शब्द आहेत, सहायक अभियंते राहुल थोरात आणि निखिल गवई यांचे. करोनाविरुद्धच्या लढाईत आपले आयु,्य सुरळित चालावे म्हमून जी माणसे लढत आहेत. त्यापैकी हा एक वर्ग ‘भारत संचार निगम लिमिटेड’च्या कर्मचाऱ्यांचा!

भारत संचार निगम लिमिटेडच्या कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरात दोन तर ग्रामीण भागातही दोन चमूंच्या माध्यमातून मनोऱ्यांच्या दुरुस्तीची कामे केली जात आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ात बीएसएनएलचे  मोबाइल फोनचे ३३८ मनोरे आहेत. तर इतर कंपन्यांचेही शेकडो मनोरे शहर व ग्रामीण भागात आहेत. कंपनी कोणतीही असो. पण मनोऱ्याशी संबंधित यंत्रणांच्या दुरुस्तीचे काम यंत्रणेतील प्रत्येकाला करावेच लागते. त्यासाठी नियुक्त ही माणसे घराबाहेर पडतात ते आपला जीव धोक्यात घालून. या सर्वावरच सध्या मोबाइल फोनवरील संवादाच्या तासांची संख्या वाढलेली असताना त्यांच्या बोलण्यात कुठे अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिक आहे. त्यात पुन्हा तापमान आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या बंद असल्यामुळे बऱ्याच वेळा विजेचा दाब वाढून निर्माण होणाऱ्या समस्या अधिक समोर येत आहेत. परिणामी मनोऱ्याशी संबंधित उपकरणे नादुरस्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. निर्माण होणाऱ्या उष्णतेला जागा मिळाली नाही तर उपकरणांवर त्याचा परिणाम होऊन ते निकामी होतात. अशी उपकरणे दुरुस्त झाले नाही तर मोबाइल संवादावर परिणाम होणार. मोबाइलवर संवाद नीटसा झाला नाही तर लोक बाहेर येऊन बोलू लागतील. नेमके तेच आम्हाला नकोय. शिवाय यासंदर्भात दिल्ली आणि मुंबई कार्यालयाकडूनही सक्त सूचना असून दुरुस्तीच्या कामांमध्ये खंड पडता कामा नये, असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे सकाळी लवकरच आम्ही बाहेर पडतो आहोत. मोबाइल मनोऱ्यांची उंची साधारण १५, १८, ४० ते ८० मीटपर्यंत असते. ४० अंशांवर गेलेल्या तापमानातही बऱ्याच वेळा रिगरला उंच मनोऱ्यावर चढावे लागते. ‘रेडिओ फ्रिक्वेन्स मोडियम’च्या उपकरणाची दुरुस्ती करावी लागते. बऱ्याच वेळा एखाद्या घरावर असणाऱ्या मनोऱ्यावर चढण्यासाठी घरमालकाची परवानगी घ्यावी लागते. करोनामुळे नवीन व्यक्तींना घरात प्रवेश सहज मिळत नाही. त्यामुळे त्यांना विश्वासात घ्यावे लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी म्हणून दिलेले साहित्य दाखवावे लागते, असे तंत्रज्ञ, रिगरकडून सांगण्यात आले.

मोबाइल फोनवर लोक बोलत राहतील तरच ते घरात थांबतील. बोलण्यावर मर्यादा आल्या तर बाहेर येण्याचा विचार येईल. त्यामुळे मोबाइल फोनच्या मनोऱ्यांची वेळेतच दुरुस्ती करावी लागेल. अन्यथा लोक बाहेर पळतील, असे ज्या इमारतीवर मनोरे आहेत तेथील घरमालकांना सांगावे लागते. त्यानंतरच इमारतीत प्रवेश मिळतो. कारण त्यांच्या मनात करोनाची लागण होण्याची एक प्रकारची भीती असते. मनोऱ्यावर चढतानाही रिगरना जीव धोक्यात घालून हे काम करावे लागते. पण सवय झालीय आणि लोकांसाठी हे काम करतो आहोत, याचे कुठेतरी समाधानही आहे. बाहेरून आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांशी संपर्क करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते. सोबतचे लॅपटॉप, मोबाइलसह इतर सर्व साहित्य सॅनिटायझर्सने स्वच्छ करावे लागते, असेही या विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दररोज २३ टेराबाइट डाटा डाउनलोड

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या टाळेबंदी करण्यात आल्यामुळे लोक घरातच बसून आहेत. मोबाइल, टीव्हीसह इतर करमणुकीची साधने हाताळण्यात येत असली तरी बीएसएनएल मोबाइलधारकांकडून दररोज २३ टेराबाइटचा वापर डाटा डाउनलोड करताना होत आहे. पूर्वी हेच प्रमाण १६ ते १७ टेराबाइट होते. औरंगाबादेत जानेवारीपासून बीएसएनएलचे ३५ हजार नवे ग्राहक वाढले आहेत, अशी माहितीही मिळाली आहे.