ग्राहक आणि भागीदार यांची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक समीर मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली. मेहता या व्यावसायिकावर २७ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली.

तक्रारदार विजय अग्रवाल यांच्या मालकीच्या ‘सिद्धिविनायक इंटरप्रायजेस’ या फर्मने पाच एक्कर जमीन फेब्रुवारी २०११ मध्ये समीर मेहता या व्यावसायिकाच्या ‘आर. के. कॅस्ट्रो कंपनीला करारनामा करून विकसित करण्यासाठी दिली होती. त्यामधून मिळणारी रक्कम अग्रवाल यांना ४५ टक्के तर मेहता यांना ५५ टक्के असा करार झाला. त्यासाठी दोघांच्यामध्ये ‘जॉईंट अकाउंट’ उघडण्यात आलं होत. सुरुवातीला काही धनादेश मेहता यांनी या अकाउंटवर टाकले. त्यानंतर मात्र मेहता यांनी पूर्ण अधिकार प्राप्त असल्याचं बनावट पत्र देऊन स्वत:च्या खात्यात पैसे जमा करून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी पोलिसात धाव घेतली. जो गृहनिर्माण प्रकल्प तयार होणार होता त्यामध्ये ४७२ सदनिका आहेत. एका सदनिकेची अंदाजे किंमत १० ते १६ लाख इतकी आहे. स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादी यांच्या फर्मची अंदाजे २७ कोटी १३ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अग्रवाल यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. तेव्हा पासून गुन्हे शाखेकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. सोमवारी सिडको पोलिसात याबाबत मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याना अटक करण्यात आली.