News Flash

पोळ्याच्या आंघोळीसाठी बैल वॉशिंग सेंटरमध्ये

लातूर जिल्ह्य़ात गणपती विसर्जन करायलाही पाणी शिल्लक नसल्याने ते रद्द होण्याची चिन्हे आहेत.

पाणी नसल्यामुळे बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी औरंगाबादजवळील आडगाव येथे शेतकऱ्यांनी वॉशिंग सेंटरवर आंघोळीसाठी बैल आणले होते.

बिपिन देशपांडे/ प्रदीप नणंदकर

लातूरमध्ये गणपती विसर्जनाचा पेच; मराठवाडय़ातील पाणीप्रश्न शिगेला

मराठवाडय़ातील दुष्काळाची भीषणता यंदा इतकी आहे, की पोळ्याच्या सणासाठी बैलांना आंघोळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना बैल घेऊन अक्षरश: गाडय़ांच्या वॉशिंग सेंटरवर आणावे लागले. राज्यभरात इतरत्र जोरदार पाऊस पडला असताना संपूर्ण मराठवाडय़ातील पाणीप्रश्न शिगेला पोहोचला असून यंदा लातूर जिल्ह्य़ात गणपती विसर्जन करायलाही पाणी शिल्लक नसल्याने ते रद्द होण्याची चिन्हे आहेत.

मराठवाडय़ातील ११ प्रमुख धरणांपैकी जायकवाडी वगळता १० धरणांमध्ये शून्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. एका अर्थात डबक्यात जेवढे पाणी साठते तशी एकूण स्थिती आहे. परिणामी बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ातील काही तालुके दुष्काळाच्या तीव्र वेदना सहन करीत आहेत. गावाच्या जवळपास कोठेच पाणी शिल्लक नसल्याने औरंगाबादजवळील आडगावचे शेतकरी अशोक लोखंडे यांनी त्यांच्या बैलांना चक्क नजीकच्या गॅरेजवरील वॉशिंग सेंटरवर नेऊन आंघोळ घातली, तर गावातील काहींनी खास बैलांसाठी टँकर मागवले. मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाचे हे विदारक चित्र. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक शेतकरी छावणीमध्ये मुक्कामी आहेत.

लातूर जिल्ह्य़ातील मांजरा नदीच्या शेजारच्या चिकुर्डा गावाच्या आसपास पाणी नसल्याने टँकरच्या पाण्यातून काही पाणी काढून ओल्या कपडय़ाने बैलांना पुसून घ्यावे लागल्याचे मदन मुकुंदराव काळे यांनी सांगितले.

गेवराई तालुक्यातील चकलंबा गावाजवळील खळेगावजवळील चारा छावणीमध्ये दहा जनावरे घेऊन पाच महिन्यांपासून मुक्कामी असणारे भगवान नरोटे सांगत होते, ‘घरी जाता येत नाही, कारण जनावरांना चारा नाही. त्यामुळे आमचा पोळा छावणीत.’ मराठवाडय़ातील छावण्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी तब्बल ३५० कोटी रुपयांची गरज आहे. त्यातील काही रक्कम अजून मिळालेली नसल्याचे छावणी चालक आहेर यांनी सांगितले.

दुष्काळाच्या या स्थितीमुळे बैलजोडीची किंमत २० ते २५ हजार रुपये एवढी खाली उतरली आहे. पाऊसमान चांगले असताना बैलजोडीच्या किमती दीड लाखापर्यंत होत्या.

बाजारपेठेवरही दुष्काळाचे सावट : पोळ्याला बलांना सजवण्यासाठी लागणारे झूल, घुंगरांच्या माळा, मुंगूस, शिंगांची रंगरंगोटी, इतर रंगीबेरंगी माळा, आदी साहित्याच्या बाजारपेठेतही दुष्काळाचे सावट जाणवत आहे. तीन दिवसांपासून हे साहित्य बाहेर लावून ठेवलेले आहे, मात्र दुष्काळामुळे शेतकरी गुरुवारीही बाजारपेठेकडे फिरकला नाही. सलग दुसऱ्या वर्षी पोळ्याच्या बाजारपेठेत ग्राहक नाहीत, असे व्यापारी शेख रफीक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:53 am

Web Title: bull washing center for a bail pola abn 97
Next Stories
1 मंदीच्या फेऱ्यात रुतले चाक ; १९ दिवसांपासून गाडी जिथल्या तिथेच!
2 आधी दुष्काळाने मारले, आता बेरोजगारीने भरडले
3 महाजनादेश यात्रेच्या रथावर अब्दुल सत्तार
Just Now!
X