27 September 2020

News Flash

बसबांधणीचा वेग मंदावला

 पूर्वी अ‍ॅल्युमिनियम पत्रा वापरून एक बस बांधण्यासाठी ९७२ तास लागायचे.

अ‍ॅल्युमिनियमऐवजी लोखंडी पत्रा वापरण्याचा परिणाम

अपघात घडला तरी प्रवाशांना इजा होऊ नये म्हणून बसची बांधणी लोखंडी धातू वापरून करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील बसबांधणीच्या वेग मंदावला आहे.

पूर्वी अ‍ॅल्युमिनियम पत्रा वापरून एक बस बांधण्यासाठी ९७२ तास लागायचे. आता नव्या बांधणीसाठी तब्बल १ हजार ८७६ तास लागतात. मनुष्यतास वाढल्याने बसबांधणीच्या वेगावर परिणाम होत आहे, मात्र केल्या जाणाऱ्या बदलामुळे बसच्या दुरुस्तीवर होणारा खर्च कमी होईल, असा दावा अधिकारी करीत आहेत. लोखंडी बनावटीच्या बसच्या नव्या रचनेमुळे बसचा खडखडाट थांबेल, असाही दावा केला जात आहे. मात्र  या निर्णयामुळे बसबांधणीचा वेग निम्म्याने घसरत असल्याकडे दुर्लक्ष होत आहे.

परिवहनमंत्री म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर बसच्या बांधणीमध्ये बदल केले जातील, असे दिवाकर रावते यांनी जाहीर केले होते. त्यानुसार राज्य परिवहन मंडळात ठराव घेण्यात आले आणि लोखंड वापरून बसबांधणीचे काम हाती घेण्यात आले. या नव्या बसची बांधणी अधिक आकर्षक आहे. बसची समोरची काच १५ अंशाने तिरकी पाडण्यात आल्याने वाऱ्याचा वेग कापण्यास बसला मदत होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, बसच्या वरच्या पत्र्यामध्ये तसेच त्याला जोडणाऱ्या नव्या अ‍ॅल्युमिनियम कंपोजिट पॅनेलमुळे पत्र्यांना रिबेट किंवा बोल्टने जोडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे बसचा खडखडाट होणार नाही, असा दावा केला जात आहे. राज्यात अशा प्रकारच्या २० बस नव्याने तयार करण्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पुणे-शिर्डी, औरंगाबाद-शिर्डी अशी लोखंडी बांधणीची बस रस्त्यावर धावत आहे. पूर्वी अ‍ॅल्युमिनियमचा पत्रा वापरून औरंगाबादच्या चिकलठाणा येथील विभागीय कार्यशाळेत बसबांधणीसाठी उपलब्ध मनुष्यबळात एक दिवसाला अडीच बस बांधली जायची. मात्र, आता तेवढय़ाच मनुष्यबळात फार तर एक बस बांधली जाऊ शकेल, असे अधिकारी सांगतात. नवीन लोखंडी बसचे वजन आता वाढणार आहे. पूर्वी बसचे वजन सात हजार ५८० किलो एवढे होते. त्यात आता एक हजार ३९० किलोची भर पडणार आहे. साधारणत: साडेपाच लाख किलोमीटर बस रस्त्यावर चालली की ती पुन्हा बांधणीसाठी घेताना लोखंडी बांधणीमध्ये तयार होणार आहे. जुन्या अ‍ॅल्युमिनियम धातू व पत्र्याच्या साहाय्याने बांधली जाणारी बस दर तीन वर्षांनी पुन्हा नव्याने बांधणीसाठी येते. मात्र, लोखंडी बसला तो खर्च करावा लागणार नाही. एखाद्या बसला अपघात झाला तरच त्यांच्या दुरुस्तीवर काही खर्च होईल, असा दावा आता राज्य परिवहन मंडळाने केला आहे. वाढलेले वजन आणि इंधनाची सरासरी याचेही गणित बदलणार आहे.

दररोज डिझेलचे दर वाढत असताना या गाडीसाठी लागणारे सरासरी इंधनही काहीसे वाढेल, असे सांगण्यात येते. मात्र, याची आकडेवारी देण्यास अधिकारी फारसे उत्सुक नसतात. नव्या गाडीचा दर्शनी भाग मात्र अतिशय छान  करण्याकडे भर आहे. नव्या रंगातही गाडी तशी रस्त्यावर उतरली असली तरी त्याच्या निर्मितीसाठी अधिक मनुष्यबळ असेल तरच  पुरेशा प्रमाणात नवीन बसगाडय़ा रस्त्यावर दिसू शकतील.

त्रुटी कोणत्या..

  • ’बसचे वजन वाढल्याने
  • इंधनावर अधिक खर्च होईल
  • ’बांधणीचे तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ यांचा ताळमेळ न बसल्याने बसबांधणीचा वेग जवळपास निम्म्यावर आला आहे.

शक्तिस्थळे..

लालगाडीच्या बसला असणाऱ्या काचा आणि या लोखंडी बसच्या बांधणीतील गाडय़ांच्या काचा नेहमीपेक्षा मोठय़ा आहेत. अपघात झाला तर पत्रा फाटून जखमी होण्याचे प्रमाण नगण्य असेल. अ‍ॅल्युमिनियम कंपोजिट पॅनेल स्वरूपाचा पत्रा असल्यामुळे त्याला चिटकवता येते. त्यामुळे बांधणीतील स्क्रू, रिबेट, बोल्ट याचा वापर करण्याची गरज भासणार नाही. आरामदायी प्रवास होईल, असा दावा अधिकारी करीत आहेत.

लोखंडी बसबांधणीला वेळ लागत असला तरी त्याचे दीर्घकालीन लाभ अधिक आहेत. बांधणी करताना त्याला एरोडायनामिक लूक दिला असल्याने आणि वापरलेला पत्रा चिकटविलेला असल्याने लाल गाडीचा खडखडाट नक्की दूर होईल.

उ. अ. काटे, व्यवस्थापक, विभागीय कार्यशाळा, औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2018 3:35 am

Web Title: bus production business slowed down
Next Stories
1 राज्यात दीड हजार विद्यार्थी तृतीयपंथी
2 रिक्षाचालकांचे अर्थकारण आक्रसले!
3 औरंगाबाद पोलीस आयुक्तपदी चिरंजीव प्रसाद!
Just Now!
X