औरंगाबाद : पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या व्यावसायिकाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनवणे यांनी दिली. शेषराव शेंगुळे (वय ५५) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. भूखंडाच्या वादातून तीनजणांनी गुरुवारी शेषराव शेंगुळे यांना विश्रांतनगर भागात पेट्रोल टाकून पेटवले होते. यात ते गंभीररीत्या भाजले होते.

या प्रकरणी मुकुंदवाडी परिसरातील राजनगरात राहणारे गजानन जाधव, एक महिला व पप्पू सूर्यवंशी (रा. जालना) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गजानन जाधव व त्याच्या पत्नीला अटक केली असून हे दोघे पोलीस कोठडीत होते. जयभवानीनगरात राहणारे शेषराव शेंगुळे यांचा भूखंड विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायातून त्यांचा गजानन जाधव, त्यांची पत्नी यांच्याशी आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र, पैशांच्या देण्या-घेण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातूनच २४ जानेवारी रोजी दुपारी विश्रांतनगर येथे शेषराव शेंगुळे यांना पेट्रोल ओतून पेटवून दिले होते.