मराठवाडय़ातील प्रश्नांची एकत्रित मांडणी करून भविष्यातील वाटचालीचा पुढचा आलेख ठरविण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला. हैदराबाद मुक्तिलढय़ानिमित्त सिद्धार्थ उद्यानात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बोलताना मराठवाडय़ाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाचा उल्लेख प्रामुख्याने करीत फडणवीस म्हणाले की, दुष्काळ हा केवळ नैसर्गिक नसून मानवनिर्मितही आहे. त्यामुळे त्याविरोधात संघटित लढा देण्याची गरज आहे. दुष्काळाच्या विरोधात निर्णायक लढा उभारत राज्य सरकारने केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत मराठवाडय़ात जलयुक्त शिवारची आणखी कामे घेण्यात येणार आहेत. शेत तेथे तळे अशी विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करण्याची व्यवस्था निर्माण करण्यावर भर राहील. त्यामुळे दुष्काळ निमूर्लनासाठी दीर्घकालीन काम उभे करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चारा छावणीपासून ते टँकरने पाणी पुरविण्यासाठीची सर्व व्यवस्था केल्याचे सांगत नुकत्याच पडलेल्या पावसामुळे जलयुक्त शिवार योजनेचा लाभ झाल्याने विहिरींचे पाणी वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अशीच सिंचन व्यवस्था वाढवित नेण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठवाडय़ाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खरे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे, संजय शिरसाट, सुभाष झांबड व भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन आदी उपस्थित होते. लढय़ातील हुताम्यांना श्रद्धांजली वाहून मानवंदना देण्यात आली. मुक्तिलढय़ाची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या संग्रहालयासाठी १० कोटी रुपये सरकार देत असल्याचे सांगत, या अनुषंगाने पालकमंत्री कदम यांनी केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.