मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षकाचा भरधाव कारखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी औरंगाबादेत घडली. भानुदास जनार्दन जाधव (४५, रा. दौलताबाद) असे या शिक्षकाचे नाव असून या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले आहेत.

दौलताबाद परिसरात खासगी शिकवणीवर शिक्षक तसेच विट भट्टीचा व्यवसाय असलेले भानुदास जाधव हे पहाटे त्यांच्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. यादरम्यान दौलताबाद बसस्थानकाजवळ भरधाव कारने जाधव यांना उडवले. जाधव यांच्या मित्रांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

वर्षभरातील तिसरी घटना

चिकलठाणा येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघांना भरधाव स्कॉर्पिओने सहा महिन्यांपुर्वी चिरडले होते. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. यातील  कारचालक अजूनही पसार आहे. तसेच ९ आॅक्टोबर रोजी रोपळेकर चौकातून पत्नीसोबत जात असलेल्या भास्कर केदारे यांना देखील अज्ञात वाहनाने धडक दिली होती. यात केदारे यांचा जागीच मृत्यू झाला होता.