औरंगाबाद : हॉटेलातील काम संपवून गुरुवारी रात्री घरी निघालेल्या अल्पसंख्याक समुदायातील तरुणाला हडको कॉर्नरजवळ अडवून जबरदस्तीने मारहाण करून जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडल्याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.

इम्रान इस्माईल पटेल (वय २८) असे जबरदस्ती आणि मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. इम्रान हा कटकट गेट येथील एका हॉटेलात वेटर म्हणून काम करतो. काम आटोपून रात्री तो जटवाडा रोड भागातील मुजफ्फरनगरमधील घराकडे दुचाकीवरून निघाला होता. हडको कॉर्नरजवळ त्याला काही तरुणांनी गाडी आडवी लावून अडवले. त्यामुळे बाजूने मार्ग काढत असताना मागून अचानक आठ ते दहा जण आले. त्यातील एकाने इम्रानच्या दुचाकीची चावी काढून घेतली, तर दुसरा हातात दगड घेऊन त्याला मारण्यासाठी उभा राहिला. अन्य तिघांनी त्याला मारहाण करत कुठे जात आहे असे विचारले. घरी जात असल्याचे इम्रानने सांगितले. याचवेळी टोपी परिधान केलेल्या युवकाने त्याला जय श्रीराम म्हणण्यास सांगितले. मात्र, इम्रान काहीही बोलत नसल्याचे पाहून या टोळक्याने त्याला शिवीगाळ करून जबरदस्तीने पुन्हा जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले. त्यामुळे घाबरून गेलेल्या इम्रानने तीन वेळा जय श्रीराम म्हटले. याचवेळी रस्त्यावरुन जात असलेल्या नागरिकांना पाहून इम्रानने आरडा-ओरड केली. त्यामुळे टोळक्यातील एकाने त्याच्यावर दगड उगारला. तेवढय़ात इम्रानचा आवाज ऐकून त्याच्या ओळखीचा गणेश मंडपवाले नावाचा व्यक्ती व त्याची पत्नी घराबाहेर आली. गणेश यांनी दगड मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाच्या तावडीतून इम्रानला सोडवले. त्यानंतर गणेश यांनी इम्रानच्या दुचाकीची चावी टोळक्यांकडून हस्तगत करून त्याला घरी पाठवले. या प्रकारानंतर इम्रानने शुक्रवारी सकाळी बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत अज्ञात टोळक्याविरुद्ध तक्रार दिली.  यासंदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी तक्रारीच्या अनुषंगाने निष्पक्ष चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.