राज्यातील पहिलाच प्रयोग
सरकारी खात्यात कॅशबुक हा महत्त्वाचा दस्तऐवज. मात्र, राज्यात सर्वत्र कॅशबुक हातानेच लिहिले जाते. अन्य राज्यांत आता कॅशबुक ई-पद्धतीनेच लिहिले जाते. संगणकावर रोजकीर्द लिहिण्याची पद्धत सुरू करता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी प्रायोगिक तत्त्वावर सोयगाव व खुलताबाद तालुक्यांत संगणकावर कॅशबुक लिहिण्याचा प्रयोग हाती घेतला जाणार असल्याचे सांगितले.
तालुकास्तरावर भेटीदरम्यान कॅशबुक पाहताना त्यात बरीच खाडाखोड दिसून आली. त्यामुळे कॅशबुकसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित केले जाणार आहे. एनआयसीच्या माध्यमातून कोषागारांच्या कामाची पुरेशी माहिती असणाऱ्या तज्ज्ञांमार्फत हे काम तीन महिन्यांत सुरू होईल, असे जिल्हाधिकारी पांडेय यांनी सांगितले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
पै-पैचा हिशेब ज्या वहीमध्ये नोंद होतो, ते कॅशबुक हाताने लिहिले जाते. एखाद्या दिवशी हिशेब जुळले नाहीत आणि लिहिताना चुका झाल्या तर तो गैरव्यवहार मानला जातो. त्यामुळे चूक झाली की त्या मजकुरावर फुली मारुन त्यावर सक्षम अधिकाऱ्यांची सही घेतली जाते. खाडाखोडीच्या या व्यवहाराला फाटा मारता यावा, तसेच संगणकावर या नोंदी घेतल्यास त्याचा पारदर्शी व्यवहारासाठी चांगला उपयोग होऊ शकेल, असे वाटल्याने ई-कॅशबुकची तयारी सुरू झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सोयगाव व खुलताबाद या तुलनेने लहान तालुक्यांत हा प्रयोग सुरू होईल. तो योग्य वाटला तर अन्यत्र राबवला जाणार आहे.
दररोजच्या नोंदी घेण्यासाठी किती वेळ लागतो, किती मनुष्यबळ लागते, हे सर्व निकष अभ्यासून हा प्रयोग अन्यत्र करता येईल का, हे ठरविले जाणार आहे. राज्यातील बहुतांश सरकारी खात्यांमध्ये लेखाविषयक नोंदी डबल एन्ट्रीनुसार केल्या जाव्यात, असे अभिप्रेत आहे. ज्यामुळे कोणत्या कारणासाठी पैसा दिला आणि कोणत्या कारणासाठी वापरला हे कळू शकते. मात्र, बहुतांश खाती त्याकडे दुर्लक्ष करतात. आता नव्या सॉफ्टवेअरमुळे काम सोपे आणि जलद होईल, असा दावा केला जात आहे.