बँक मित्रांच्या मदतीने प्रशासनाचे प्रयत्न; प्रत्येक गावात यंत्रणा उभी करण्याचे आव्हान

औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीपासून ७ किलोमीटरच्या जडगावमध्ये संभाजी सेमीनाथ भोसलेंच्या दुकानात काळे नावाचे गृहस्थ पोहोचले. त्यांना बिस्कीटचा पुडा घ्यायचा होता. कंपनीने नेमलेल्या बँक मित्रला स्वत:चे आधार कार्ड दाखवले. त्याने अंगठा उमटवायला सांगितले. आधार कार्डाशी जोडणी झालेल्या काळेंचे ४ रुपये बँकेतून कटले. व्यवहार पूर्ण झाला. गावातील प्रत्येक माणसाचे आता बँक खाते आहे. व्यवहारही रोकडरहित झाले आहेत.

मंगळवारी अधिकाऱ्यांच्या गाडय़ा धुरळा उडवीत आल्या. एका मंडपात ‘कॅशलेस इकॉनॉमी’चे फायदे त्यांनी गावकऱ्यांना समजावून सांगितले आणि जडगाव आज ‘रोकडरहित’ म्हणून घोषित झाले. रोकडविरहित हा व्यवहार ज्या वकरंगी कंपनीच्या ज्या १२ बँक मित्रांच्या साहाय्याने सुरू होता, ते कर्मचारी या गावात आणखी किती दिवस काम करतील, ते केवळ या एकाच गावात काम करतील काय, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहीली.

सध्या रोकडरहित व्यवहारावर भर देण्यासाठी सरकारी यंत्रणांनी कंबर कसली आहे. औरंगाबाद जिल्हय़ात किमान अशी १०० गावे करण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले आहे. पहिले गाव जडगाव. २००१च्या जनगणनेनुसार १ हजार ६५० लोकसंख्या. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी जडगावची निवड केली. तरुण ग्रामसेवक सिद्धार्थ शेळके कामाला लागले. रात्री ११ पर्यंत गावात थांबून त्यांनी सर्वाची खाती काढून घेतली. १२ दुकानांमध्ये बँक मित्र बसविण्यात आले. प्रत्येक व्यवहाराला त्यांना ०.३ पैसे कमिशन. राजू काकडे सांजखेडामध्ये बी.ए.पर्यंत शिकलेले. त्यांनी बँक मित्र म्हणून अलीकडेच काम करण्यास सुरुवात केलेली. आता ते खूश आहेत. कारण व्यवहार वाढला आहे. गावाची लोकसंख्या आणि बँक मित्रची संख्या याचे प्रमाण जडगावमध्ये जुळले. ३ हजार लोकसंख्येसाठी १२ बँक मित्र.  जिल्हय़ात १२४३ बँक मित्र आहेत. त्यांना प्रत्येक गावात नेमायचे कसे, असा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. बँक मित्र होण्यासाठी कोणत्याही १२वी उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्तीचे  खाते असावे लागते. त्यात किमान १० हजार रुपये आवश्यक असतात. पैसे काढायचे असतील तर आधार लिंकच्या आधारे तो रोख रक्कम देतो आणि संबंधिताच्या खात्यातून ती रक्कम बँक मित्राच्या चालू खात्यात वर्ग होते. अशा प्रकारे रोकडविरहित व्यवहार व्हावेत, यासाठी सरकारी यंत्रणांनी कंबर कसली आहे.

कॅशलेसरेशमाबाई

रेशमाबाई गजरेंची दोन्ही मुले शेंद्रा एमआयडीसीमध्ये मजूर म्हणून काम करतात. जडगावमध्ये त्या आणि त्यांचा पती दशरथ हे दोघेच राहतात. मंगळवारी रात्री खाते काढण्यात आले. पिवळे रेशनकार्ड आणि ‘स्व’ खात्याच्या माहितीचे पाकीट न उघडणाऱ्या रेशमाबाई म्हणाल्या, माझ्याकडे अजून तरी शे-पाचशे रुपये आले नाहीत. त्यामुळे खात्यात काही रक्कम टाकली नाही. ‘कॅशलेस’ अवस्थेतील रेशमाबाईला रोकडविरहित व्यवहारात आणण्यासाठीची तयारी पूर्ण झाली. त्या परिघात रेशमाबाई आल्याही, मात्र त्यांचे ‘कॅशलेस’पण निराळेच. त्या म्हणाल्या, ‘एखादे घरकुल मिळाले तर बरे होईल.’