गणरायाच्या आगमनाच्या तयारीसाठी रविवारी बाजार फुलला होता. औरंगाबाद शहरातील सेव्हन हिल भागात आकर्षक गणपती मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या जातात. आज सकाळपासून आपल्या आवडत्या बाप्पाची मूर्ती राखून ठेवता यावी, या साठी नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. वेगवेगळय़ा आकर्षक मूर्तीसह फुले, लायटींगच्या माळा खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची चांगलीच लगबग होती. सजावट आणि श्री च्या स्थापनेसाठी मंडप उभा करण्याची तयारी रविवारी दिवसभर सुरू होती.

औरंगाबाद शहरातील गणेश महासंघ उत्सव समितीने येत्या १० दिवसात विविध सामाजिक उपक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. शाळा, महाविद्यालये यांच्या सहकार्याने स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

६ सप्टेंबर रोजी श्रेयनगर येथे रांगोळी स्पर्धा होणार असून या स्पध्रेचे उद्घाटन महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर करणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी आमदार अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थित वृक्षारोपण केले जाणार आहे. ऐतिहासिक नाणी आणि वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले असल्याची माहिती गणेश उत्सव महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिली.

मोरयाच्या आगमनासाठी तयारीत सर्वजण असल्याचे चित्र रविवारी दिवसभर होते. गणेशोत्सवाच्या काळात शांतता रहावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी वाहतूक पोलीसही प्रयत्न करीत आहेत.