केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात – पंकजा मुंडे
केंद्राचा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे ग्रामविकासासाठी यापुढे कोणाकडे हात पसरण्याची गरज राहणार नाही. या अधिकाराचे रूपांतर अहंकारात न होता जबाबदारीची जाणीव ठेवून विकासाची कामे करा, असे आवाहन ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
जिल्हा परिषद आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या वतीने २०१२-१३ च्या निर्मलग्राम पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. जि. प. अध्यक्षा प्रतिभा पाटील, आमदार सुधाकर भालेराव व विनायक पाटील, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे आदी उपस्थित होते. मंत्री मुंडे म्हणाल्या की, केंद्र सरकारने ग्रामीण विकास, स्वच्छता यास प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. विकासाला निधीची अडचण येऊ नये, या साठी सर्व अडथळे दूर करून पाच वर्षांत १५ हजार कोटी रुपये ग्रामीण विकासावर खर्च केले जाणार आहेत. कोणतीही योजना राबविताना पद्धत बदलली, तर तिचे चळवळीत रूपांतर होऊ शकते, हे सिद्ध झाले आहे. ग्रामविकास ही चळवळ व्हावी, या साठी सरपंचांनी योजना सोपस्कार न बनता संकल्प बनविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. निर्मल गावे ही आदर्शच आहेत. सरपंचांनी आपले नाव लोकांनी चांगल्या अर्थाने कायमस्वरुपी लक्षात ठेवावे, या साठी संकल्प करावा. त्यानंतर योजनाबद्ध आखणी करावी. मुलींनीही आता ज्या घरी शौचालय नाही, त्या घरातील मुलाशी लग्न करणार नाही, असा संकल्प करण्याची वेळ आली आहे. आता तर मुलींना हुंडा मिळत आहे. आई-बहिणीच्या सन्मानासाठी घरोघरी शौचालय बांधण्याचे आवाहन त्यांनी केले.
लातूर जि. प.ने प्रत्येक जि. प. मतदारसंघात एक या प्रमाणे ५८ गावे स्मार्ट करण्याचा संकल्प केला असून, सरकारने या साठी वेगळा निधी देण्याची मागणी अध्यक्षा पाटील यांनी केली, तर उद्गीर आणि जळकोट हे दोन्ही तालुके निर्मलग्राम करण्याचा संकल्प आमदार भालेराव यांनी केला. आमदार पाटील, जगदाळे यांचीही भाषणे झाली. पुरस्कारप्राप्त ५३ ग्रामपंचायतींचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.