केंद्रीय पथकाचा दौरा पूर्ण
रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई व चारा छावण्यांसाठी २२५१ कोटी रुपये मिळावेत, या राज्य सरकारने केलेल्या मागणीबाबत छाननीसाठी राज्यात उशिराने आलेल्या केंद्राच्या पथकाने शुक्रवारी दौरा पूर्ण केला. मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी माहिती केंद्राच्या पथकाने मागवली असून, जूनअखेपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मदत मिळू शकेल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांनी दिली. केंद्राच्या पथकाने सोलापूर, नगर, उस्मानाबाद व बीड जिल्हय़ांतील दुष्काळग्रस्त भागातील टंचाई उपाययोजनांची पाहणी केली.
रब्बी हंगामातील पिके काढून झाल्यानंतर अगदी पावसाळ्याच्या तोंडावर केंद्रीय पथकाचा हा दौरा वरातीमागून घोडे असल्याची टीका मराठवाडय़ात व्यक्त होत आहे. हा दौरा करण्यास उशीर झाला का, असा प्रश्न गोविंदराज यांना विचारला असता ते म्हणाले की, रब्बी हंगाम संपल्यानंतर अंतिम पैसेवारीचा अहवाल आल्यानंतरच पाहणी होते. त्यामुळे मेअखेरीस या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाणी व चाराटंचाई उपाययोजनांची पाहणी पथकाने केली. दौऱ्यासाठी रब्बी जिल्ह्य़ांची निवड करण्यात आली होती.
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा तालुक्यात तसेच बीड जिल्हय़ात शेतकऱ्यांच्या भेटी पथकाने घेतल्या. पाहणीनंतर आणखी काही माहिती आवश्यक असल्याचे पथकप्रमुख कुमुदिनी राणी यांनी सांगितले. या वर्षांत रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्रही घटले होते. पाऊस नसल्याने मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आत्महत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. पाऊस झाला तर नव्याने पेरणीसाठी पीककर्जाची समस्या आ वासून उभी आहे. या स्थितीत नव्याने जूनपर्यंत मदत मिळेल असे सांगितले जात आहे. पथकात आर. पी. सिंग, एच. आर खन्ना, बी. के. मिश्रा, जी. आर. झरगल या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 12:03 am