पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा वरातीमागून घोडे
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणी आणि चारा टंचाईस केंद्राकडून अतिरिक्त निधीसाठी पाठवलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्यापासून (गुरुवार) उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ांच्या दौऱ्यावर येणार आहे. रब्बी हंगामातील पिकेही पथकाला आता पाहायला मिळणार नसल्याने टँकर आणि चारा छावण्या कशा सुरू आहेत, हे त्यांना दाखवले जाईल.
कृषी सहसचिव राणी कुमुदिनी, आर. पी. सिंग, केंद्रीय पशुसंवर्धन सहायक आयुक्त एच. आर. खन्ना, सहायक आयुक्त बी. के. मिश्रा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे वरिष्ठ सल्लागार जी. आर. झरगल या पाच अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे. मराठवाडय़ातील २० लाख ७७ हजार हेक्टर रब्बी क्षेत्रावर पेरणी झाली होती. एकूण क्षेत्राच्या ३२ टक्के क्षेत्रावर २ हजार ८३९ गावांमध्ये पेरण्यात आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. खरीप व रब्बी हंगामांत झालेल्या नुकसानभरपाईपोटी सरकारने एकदा मदत केली. या रकमेचे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. अशा स्थितीत शेतात एकही उभे पीक नसताना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा केंद्रीय पथकाचा हा दौरा म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून हा दौरा केवळ पाणीटंचाई व चारा छावण्यांसाठीच असल्याचे सांगितले जात आहे.
मराठवाडय़ात सध्या ३ हजार ८९४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्य़ांत चारा छावण्या सुरू आहेत. परभणीत एका छावणीत ९४८ जनावरे असून बीड जिल्ह्य़ात २६५ छावण्यांमध्ये २ लाख ५६ हजार २३ जनावरे आहेत. उस्मानाबाद जिल्ह्य़ातही ८३ छावण्या सुरू असून यात ७० हजार ७५६ जनावरांना चारा उपलब्ध करून दिला जात आहे. बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ांतच मोठय़ा प्रमाणात छावण्या उघडण्यात आल्या. छावण्यांवर आतापर्यंत १७१ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. चारा छावण्या आणि टँकरसाठी अधिकचा निधी लागू शकेल, या साठी अतिरिक्त निधी मिळावा, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला आहे. हा अतिरिक्त निधीचा प्रस्ताव पंतप्रधानांसमवेत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मांडण्यात आला होता. या निधीच्या मागणीची छाननी करण्याच्या अनुषंगाने केंद्रीय पथकाचा दौरा होणार आहे.
दौऱ्याबाबत आश्चर्य
पथकातील सदस्यांनी बुधवारी पुणे येथे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या सकाळी पथक सोलापूर येथे येणार असून त्यानंतर उस्मानाबाद व बीड जिल्ह्य़ांतही दुष्काळग्रस्तांसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेणार आहे. पथकाच्या दौऱ्यानंतर केंद्राकडून नक्की कोणत्या स्वरुपाची मदत मिळू शकेल, या विषयी साशंकता व्यक्त होत असून, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक उशिराने मराठवाडय़ात येणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.