नजर पैसेवारीचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्य सरकारने ४ हजार कोटींची केलेली मागणी योग्य आहे की नाही, याची छाननी करण्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाडय़ात आलेल्या केंद्रीय पथकाला शेतकऱ्यांनी आज प्रश्न विचारून हैराण केले. व्यथा सांगत आता जगायचे कसे, असा प्रश्नही विचारला गेला आणि त्यांना उत्तर दिले गेले, ‘तुमच्याकडची पीक पद्धती बदला!’ शेतकरी आणि पथकाच्या प्रश्नोत्तरी धावत्या दौऱ्यात बीड जिल्ह्य़ात कोळगाव येथे अधिकाऱ्यांचा ताफाही अडविण्यात आला. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मध्यस्थी केल्यानंतर पथक पुढच्या गावाला रवाना झाले.

या पथकाचा दौरा रविवापर्यंत असून महसूलमंत्री एकनाथ खडसेदेखील पथकाच्या भेटीसाठी औरंगाबाद येथे रविवारी येणार आहेत. त्यानंतर मदतीबाबतचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर होणार आहे. मराठवाडय़ातील ८ हजार गावांमध्ये ५० टक्क्य़ांपेक्षा कमी नजर पैसेवारी आल्यानंतर मदतीबाबतचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय फलोत्पादन आयुक्त एस. के. मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील १० अधिकाऱ्यांचे एक पथक मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आलेले आहे. आज सकाळी ८ वाजता पथकाचे तीन संघ करण्यात आले. त्यातील एक संघाने औरंगाबाद व बीड जिल्ह्य़ाची पाहणी केली. यात आर. पी. सिंग व एच. आर. खन्ना, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्य़ातील आडूळ, एकतुनी व पाचोड येथे पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. खरीप हंगामात पीक वाया गेले हो, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पथकाच्या धावत्या दौऱ्यावर अनेक ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
पथक गाडीतून उतरले की, त्यांची छायाचित्रे घेतली जायची. व्यथित शेतकऱ्यांशी चार-पाच मिनिटे ते बोलायचे आणि पुढच्या गावी जायचे, असा क्रम दिवसभर सुरू होता. हवामानात बदल होत असल्याने त्याचा परिणाम पावसावर होत आहे. त्यामुळे या भागातली पीक पद्धतीच बदलायला हवी, असे मत केंद्रीय फलोत्पादन आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. वारंवार येणाऱ्या या पथकामुळे मराठवाडय़ातील शेतकरी वैतागले असल्याचे चित्रही दिसून आले. शनिवारी हे पथक उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असून ते तेथे केवळ तीन तास थांबणार आहेत. बीड जिल्ह्य़ात कोळेगाव येथे पूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा मागणीचे फलक गळ्यात अडकवून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचा ताफा अडवला. औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ात या पथकाला फारसा विरोध झाला नाही. मात्र, वारंवार होणाऱ्या पथकांची पाहणी व न मिळणारी मदत यामुळे शेतकरी वैतागले आहेत.