दोन दिवसांपासून केंद्र शासनाची दोन पथकं जिल्हय़ाच्या वेगवेगळ्या भागांत धावत्या भेटी घेऊन जाताना त्यांनी सेलू तालुक्यात शनिवारी रात्री वाहनाच्या उजेडात पिकांची पाहणी केली. अंधारात पिकांची पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाची दोन पथकंदोन दिवसांपासून मराठवाडय़ात भेटी देत आहेत. शुक्रवारी जिंतूर तालुक्यात एका पथकाने धावता दौरा केला होता तर शनिवारीदेखील एका पथकाने सोनपेठ, पाथरी असा दौरा करून रात्री ८.३० च्या सुमारास सेलू तालुका गाठला होता. शनिवारी केंद्राचे पथक सेलू तालुक्यात दुपारी ३ वाजता येणार होते. त्यामुळे स्थानिक अधिकारी आणि शेतकरी ३ वाजल्यापासून नागठाणा शिवारात रमेश मोगल यांच्या शेतात वाट पाहत होते. परंतु हे पथक आले रात्री ८.३० वाजता. अंधार असल्याने वाहनांचा उजेड वापरून मोगल यांच्या शेतातील ज्वारीच्या पिकाची पाहणी या अधिकाऱ्यांनी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी संतापाने ज्वारी उपटून पथकासमोर टाकली आणि प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कापसाला भाव कमी का दिला, शेतकऱ्यांना ताटकळत ठेवून आमचा अंत पाहत आहात का, असा सवाल करताच अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.