दगडफेकीत पोलीस अधिकारी जखमी, सहा ठाण्यात गुन्हे

जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, या घोषणांनी औरंगाबाद शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान दुमदुमून गेले. कार्यकर्त्यांच्या अभूतपूर्व उत्साहात बहुतांश ठिकाणी आंदोलन शांततेत पार पडले. मात्र तीन ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी घालून दिलेली आचारसंहिता न पाळता घोषणाबाजी व गोंधळ घातला. काही ठिकाणी दगडफेक करण्याचे प्रकार केल्यामुळे हर्सूल टी पॉइंट, आकाशवाणी चौक व ओअ‍ॅसिस चौकात पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला. हर्सूल येथील दगडफेकीत पोलीस निरीक्षक शेख सलीम जखमी झाले. पोलिसांनी सुमारे १३४ जणांना ताब्यात घेतले असून त्यातील ६५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.

आंदोलनासाठी मंगळवारी सकाळपासूनच शहरासह परिसरातील गावांमधूनही मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहरात टेम्पो, ट्रक आदी वाहनातून भगवे झेंडे घेऊन दाखल होत होते. औरंगाबाद शहरात नऊ ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक कार्यालयाचे ठिकाण असलेले आकाशवाणी चौक, सिडको चौक, हर्सूल टी पॉइंट, धूत हॉस्पिटल, वाळूज, केंब्रिज शाळा, पैठण रोडवरील महानुभाव आश्रम, ओअ‍ॅसिस चौक आदी ठिकाणांचा समावेश होता. काही ठिकाणी वाहने अडवणे, गराडा घालून घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. हर्सूल टी पॉइंटवर दगडफेक व त्यात पोलीस निरीक्षक शेख सलीम जखमी झाल्याचे कारण देत पोलिसांनी लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली. आकाशवाणी चौकातही आंदोलनाची वेळ संपल्याचे सांगत पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा या घोषणा थांबत नाहीत, हे पाहून जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला केला. काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सिडकोनजीक पोलिसांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रकार झाल्याचे सांगत जमाव पांगवण्यासाठी गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना पांगवले. ओअ‍ॅसिस चौक व महानुभाव आश्रमापासून काही अंतरावर किरकोळ दगडफेकीची घटना वगळता तेथे आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर औरंगाबादेत चौकाचौकात मोठा पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकांना पोलीस ठाण्यात नेण्यासाठी एसटीसह काही खाजगी वाहनांचीही व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली होती.

मराठा समाजाचा जिल्हाभर चक्का जाम

लातूर- मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांसााठी स्वामिनाथन आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास सर्व ठिकाणी उत्स्फूर्त पािठबा मिळाला.

जिल्हय़ातील सर्व दहा तालुक्यांत चक्का जाम आंदोलनाचे केलेले नियोजन प्रत्यक्षात उतरले. लातूर शहरात पाच ठिकाणी आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक ठिकाणी तरुणांनी चक्का जाम आंदोलन केले त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतूक विस्कळीत होती. राजीव गांधी चौक, नंदी स्टॉप, शिवाजी चौक, बार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्ता, नांदेड रस्ता, गांधी चौक अशा विविध ठिकाणी मराठा तरुणांनी चक्का जाम आंदोलन केले.

एसटी बसस्थानकात सुमारे सात तास बस ताटकळत उभ्या होत्या. औसा, निलंगा, देवणी, निटूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, किनगाव, शिरूर अनंतपाळ, किल्लारी, मुरूड येथेही मराठा तरुणांनी चक्का जाम आंदोलन केले. अतिशय जिव्हाळय़ाचा प्रश्न असल्यामुळे वाहतूकदारांनीही या आंदोलनाबद्दल सहानुभूती व्यक्त केली.०

कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे जाणारी वाहतूक खोळंबली

उस्मानाबाद-  महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे जाणारी वाहतूक मराठा क्रांती मोर्चाच्या चक्का जाम आंदोलनामुळे तब्बल दोन तास ठप्प झाली. उमरगा येथे सीमा तपासणी नाका असल्यामुळे येथील आंदोलनामुळे वाहतुकीचा अधिक खोळंबा झाला.सकाळी ११ वाजता शहरातील तेरणा महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय येथे महामार्गावर वाहने अडवून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांगच रांग लागली होती. रुग्णवाहिकांना मात्र न अडविता त्यांना आंदोलकांनी जाऊ दिले. त्यामुळे रुग्ण वगळता दुचाकी, चारचाकी व बसगाडय़ांमधून शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गरसोय झाली.

चक्का जाम आंदोलनामुळे त्रास सहन करणाऱ्या मालट्रक, बसचालक, जीपचालक, रिक्षाचालकांना आंदोलकांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत चालले. परिणामी शहरातील तेरणा महाविद्यालय ते एमआयडीसीतील महामार्गावर जवळपास तीन किलोमीटपर्यंत वाहनांची रांगच रांग लागली होती.

जालन्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा

जालना- जालना जिल्ह्य़ात एकोणवीस ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन केले. शांततेत झालेल्या आंदोलनास हजारो समाजबांधव उपस्थित होते. जालना शहरात औरंगाबाद रस्त्यावर झालेल्या आंदोलनामुळे दोन तासांपेक्षा अधिक काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बदनापूर येथे मुख्य रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. बदनापूरमधून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे जवळपास वाहतूक बंद पडली होती.

जालना तालुक्यातील रामनगर येथे झालेल्या चक्का जाम आंदोलनातही समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते. परतूर तालुक्यातील वाटूर आणि मंठा येथील चक्का जाम आंदोलनामुळे नांदेड तसेच परभणीकडून औरंगाबादकडे जाणारी तसेच नांदेडकडे जाणारी वाहने काही काळ थांबली होती. जाफराबाद, भोकरदन या तालुक्यांच्या ठिकाणीही चक्का जाम आंदोलन करण्यात आले. याशिवाय राजूर, कुंभार पिंपळगाव, टेंभुर्णी इत्यादी ठिकाणीही चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जालना येथे जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदन मंडल निरीक्षक यांनी स्वीकारले.

रामनगर येथे चक्का जाम करणाऱ्या आंदोलकांसमोर शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे भाषण झाले. सकल मराठा समाजाच्या मागण्यांना आपला आणि शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांशीही या मागण्यांबाबत चर्चा झाली असून तेही सकारात्मक असल्याचे खोतकर या वेळी म्हणाले.

रुग्णवाहिकांसाठी रस्ता मोकळा

जालना-औरंगाबाद मार्गावरून घाटीमध्ये जाणाऱ्या तीन ते चार रुग्णवाहिका नेमक्या आंदोलनाच्या वेळी येत असताना त्यांना कार्यकर्त्यांनी वाट मोकळी करून देऊन चक्का जाम केले.

काही पदाधिकारी, नेते ताब्यात

विविध ठिकाणी केलेल्या आंदोलनातून पोलिसांनी १३४ जणांना ताब्यात घेतले. त्यातील ६५ जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील. काही ठिकाणी उद्भवलेल्या परिस्थितीने लाठीहल्ला करावा लागला. दौलताबादेतूनही २० जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, अभिजित देशमुख, प्रकाश औताडे, नगरसेवक मनोज बल्लाळ, रामेश्वर भादवे, विजू वानखेडे आदी सहभागी झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले होते.

सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है

‘तुमचं आमचं नातं काय?’ अशी घोषणा एकाने दिली आणि समूहातून आवाज आला ‘जय भवानी जय शिवराय’. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी कार्यालयासमोर आकाशवाणी चौकात कार्यकर्त्यांचा उत्साह टीपेला होता. आरक्षणाच्या मागणीचे फलक हातात धरलेल्या कार्यकर्त्यांनी सगळा परिसर गजबलेला. कार्यकर्ते जमत होते. कोणाच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असणारा भगवा ध्वज उंचावला जात होता. घोषणांचा आवाज वाढू लागला ‘एक मराठा’ असं एक कार्यकर्ता म्हणायचा, समूहातून आवाज यायचा ‘लाख मराठा’. आकाशवाणी चौकासमोरील मोकळय़ा जागेत कार्यकर्ते एकत्र येत होते. तसतसे पोलिसांनी डोक्यावर हेल्मेट घालण्यास सुरुवात केली. पोलीस सहआयुक्त सी. डी. शेवगण यांच्यासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त सर्वत्र होता. आंदोलनकर्त्यां कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यापर्यंत नेण्यासाठी गाडय़ा रांगेत उभ्या करण्यात आलेल्या. ११.३० च्या सुमारास घोषणा टीपेला पोहोचल्या आणि एवढा वेळ सुरू असणारी वाहतूक तशी रोडवली होती. तुरळक वाहनेही जाणे आता बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरेकेड्स बाजूला केले. चौकात पुन्हा ‘जय भवानी जय शिवाजी’चा या घोषणेचा जयघोष झाला. मुख्यमंत्री लक्ष द्या, पुढे इलेक्शन आहे, असे फलकही आवर्जून पुढे केले जात होते. मराठा आरक्षणाची मागणी जोरदारपणे पुढे रेटली जात होती. चौकातील कार्यकर्त्यांना मग नेत्यांनी बसण्याची विनंती केली. काहींनी बसकण मारली. जसजसे कार्यकर्ते घोषणांचा जोर वाढवत होते. तस तसे पोलीसही कार्यकर्त्यांना शांतता पाळण्याचे आवाहन करीत होते. नेत्यांना एव्हाना पोलिसांनी गाठले होते. काहींना गाडय़ातून पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले. तोपर्यंत कार्यकर्त्यांच्या घोषणांचा जोर वाढला. पोलीस कार्यकर्त्यांना सांगत होते आता जर रस्त्यावरून दूर झाला नाहीत तर कारवाई करू. शेवटी काठय़ा उगारत काही पोलीस चाल करून येताहेत, असे दिसताच पळापळ सुरू झाली. पुन्हा कार्यकर्ते चौकात आले. पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. तेव्हा पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. मराठा मोर्चाच्या राज्यव्यापी कार्यालयासमोरच्या मोकळय़ा जागेत कार्यकर्त्यांनी जावे यासाठी पोलीस प्रयत्न करीत होते. अधून-मधून कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर येत होते. तेव्हा उपस्थित महिलांनी घोषणा दिली- ‘सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है’ शेवटी पोलिसांनी दिलेल्या वेळेच्या आता कार्यकर्त्यांना हुसकावले. वाहतूक सुरळीत केली. कार्यकर्ते मागणी करीत राहिले, आरक्षण मिळायलाच पाहिजे. आकाशवाणी चौकात आंदोलन सुरू असतानाच शहरातील तीन चौकात कार्यकर्त्यांना हुसकावण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. शांततेमध्ये व शिस्तीत काढलेल्या मोर्चानंतर चक्काजाममुळे शहरातील जनजीवन मात्र काही काळ ठप्प होते. रस्ते सुनसान होते. दुपारनंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.