News Flash

करोनावरील बदलत्या उपचारपद्धतीने औषधनिर्माण कंपन्यांसमोर आव्हान

प्रत्येक औषधांमध्ये एक्सीपीयन्ट, एपीआय (अ‍ॅक्टिव्ह फार्मास्यूटिकल इन्ग्रिडियन्ट-सक्रिय औषधी घटक) हा मुख्य घटक असतो.

हायड्रोक्लोरोफिन, जीवनसत्त्व ‘क’, ‘ड’ औषधांच्या मागणीत घट

औरंगाबाद : करोनाच्या पहिल्या लाटेत उपचार पद्धतीत वापरण्यात आलेली काही औषधे दुसऱ्या लाटेत उपयोगशून्य ठरत असल्याने उत्पादनाबाबत औषधनिर्माण कंपन्यांसमोरही मोठे आव्हानच उभे राहिले आहे. हायड्रोक्लोरोफिन, जीवनसत्त्व क, ड सारख्या औषधांचा साठा सध्या अनेक कंपन्यांकडे पडून आहे. याशिवाय राज्य आणि देशातील बहुतांश कंपन्यांना उत्पादनासाठी लागणारा माल पुरवठा, वाहतूक, विपणन आदी समस्यांतूनही जावे लागत आहे.

प्रत्येक औषधांमध्ये एक्सीपीयन्ट, एपीआय (अ‍ॅक्टिव्ह फार्मास्यूटिकल इन्ग्रिडियन्ट-सक्रिय औषधी घटक) हा मुख्य घटक असतो. हा घटक औषधनिर्माण कंपन्यासाठी आवश्यक असतो. मात्र, एक्सीपीयन्टसह एपीआयची आयात चीनमधून केली जाते. भारत आणि चीनमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध सध्या ताणतणावात असल्याने या दोनही घटकाबाबत देश आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने पाऊले टाकत आहे. देशातील अनेक कंपन्या एक्सीपीयन्ट व एपीआय घटक तयार करत असल्यातरी चीनमधील दर आणि भारतातील दरामध्ये काहीसा फरक आहे. चीनमधील दर हे भारतातील दरापेक्षा स्वस्त आहेत. त्यातही एक्सीपीयन्टपेक्षा औषधांमध्ये सर्वाधिक मात्राने वापरण्यात येणाऱ्या एपीआयसारख्या प्रमुख घटकाच्या पुरवठय़ातही अडचणी येत असल्याचे औषधनिर्माण कंपन्यांच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.

करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे अनेक डॉक्टरांनी नियमित सेवा बंद केलेली आहे. त्यामुळे करोनाशिवाय अन्य आजारांसाठी लागणाऱ्या औषधांचे विपणनही थांबलेले आहे. विपणन प्रतिनिधींना डॉक्टरही भेटत नाहीत. त्यामुळे औषध निर्माण कंपन्यांची विपणन यंत्रणाही कोलमडली आहे. हायड्रोक्लोरोफिन, जीवनसत्त्व क, ड सारखी (व्हिटॅमिन सी-डी) औषधे करोनाच्या पहिल्या लाटेत वापरण्यात येऊ लागल्याने त्याचे मोठय़ा प्रमाणात कंपन्यानी उत्पादन केले. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत आणि बदलत्या उपचार पद्धतीत हायड्रोक्लोरोफिनसह  केवळ जीवनसत्त्व क सारख्या औषधांची मागणी घटली. परिणामी अशी औषधे पडून राहिली आहेत. अशा औषधांचा कालबाह्य़ होण्याचा कालावधी अवघ्या दोन वर्षांचा असून उत्पादित मालाला जवळपास एक वर्ष लोटले असल्याने ती आता पडून आहेत. त्याचा तोटा कंपन्यांना सहन करावा लागत आहे. मालवाहतुकीच्याही समस्या औषध कंपन्यांसमोर असल्याचे निर्माण क्षेत्रातील संचालक सांगत आहेत.

करोनाच्या परिस्थितीमुळे एकूण औषधनिर्माणमधील ९० टक्के कंपन्यांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. एक्सीपीयन्टसारखा घटक आयात करण्यात बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. विपणन व्यवस्थेत अडचण आहे.  हायड्रोक्लोरोफिन, जीवनसत्त्व क, ड, सारख्या औषधांची साठे करोनाची उपचार पद्धती बदलत असल्यामुळे पडून आहेत. त्यामुळे नेमके उत्पादन घेण्याबाबत निर्णय घेता न येणासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मूलभूत घटकाच्या किमतीतही बदल होत आहेत. मात्र, औषधांबाबत किमती वाढवण्याचे निर्णय कंपन्यांना घेता येत नाहीत.

– विनय जोशी, कंपनी संचालक

काही बाबींमध्ये औषधनिर्माण कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत पुरवठा साखळी मजबूत नाही. बरेच डॉक्टर नियमित सेवा देत नाहीत. कोविडशी संबंधितच उपचारावर लक्ष केंद्रित झाले आहे. औषध विपणन प्रतिनिधी व डॉक्टरांची भेट घडून येत नाही. नियमित आजाराशी संबंधित औषधांची मागणीच घटली आहे. एपीआयसारखा औषध निर्मितीत आवश्यक असणारा घटकही मिळण्यात अडचणी येत आहेत.

कॅप्टन अनिल सावे, औषधनिर्माण कंपनी प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 1:36 am

Web Title: challenges facing pharmaceutical companies corona ssh 93
Next Stories
1 मराठवाडय़ासाठी २०५ टन प्राणवायू पुरवठय़ाचे आदेश
2 वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कोविडच्या नव्या अभ्यासक्रमाचा प्रस्ताव
3 इथेनॉल प्रकल्पातून प्राणवायू निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प यशस्वी
Just Now!
X