महापालिकेने २९५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे, त्याच्या वसुलीसाठी नोटिसा देऊन संबंधितांना पोलीस आयुक्तालयात बोलावण्याच्या विरोधात खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर आगपाखड केली. मतदारांना खूश ठेवणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. अधिकारी त्रास देणार असतील तर ते चालणार नाही, असे ठणकावून सांगत मालमत्ता कराच्या वसुलीला पोलीस संरक्षण मागण्याच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली. या बाबतची तक्रार पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली असल्याचे खैरे यांनी सांगितले. दरम्यान, मालमत्ता कराच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात बैठक घेण्यात आली.
महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता वसुलीची मोहीम अधिक तीव्र करा, अशा सूचना पदाधिकारी देत होते. या पाश्र्वभूमीवर आयुक्त बकोरिया यांनी मालमत्ता न भरणाऱ्यांना नोटिसा पाठविल्या. या बाबतची माहिती आणि बोलणीसाठी नागरिकांना पोलीस आयुक्तालयात बोलावून घेण्यात आले होते. या वेळी कर भरूनही नोटिसा आल्याची तक्रार काही नागरिकांनी केली. त्यावर अशा चुका दुरुस्त करण्यास शिबिर घेऊ, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. पोलीस आयुक्तांसमोर मालमत्ता कराबाबत बैठक झाल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये रोष होता. महापौर-उपमहापौर यांनीही अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. वारंवार सांगून वसुली होत नाही आणि पोलिसांना पुढे करून केली जाणारी वसुली गैर असल्याचे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. या सर्वाचा परिणाम म्हणून वर्धापनदिन मेळाव्यात खासदार खैरे यांनी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त या दोघांवर आगपाखड केली.
खैरे म्हणाले की, नगरविकास विभागाच्या सचिवांना सकाळी दूरध्वनी करून विचारले, पठाणी राज्य सुरू आहे काय? जनतेला त्रास दिला जात आहे. कालचे आलेले अधिकारी वाट्टेल तसे काम करू लागले आहेत. खरे तर शहराला केंद्रेकरांसारखा माणूस हवा होता. पोलीस आयुक्तांवरही नाराजी व्यक्त करीत खैरे यांनी तुमचे काम गुन्हे थांबविण्याचे आहे. त्यात कमी पडत आहात आणि इकडे मालमत्ता करात कशाला ढवळाढवळ करता, असे दूरध्वनीवरून विचारले. त्यावर महापालिकेने पोलीस संरक्षण मागितल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. एवढे अवैध धंदे सुरू असताना अशा कामात कशाला लक्ष घालता, असेही सुनावल्याचे खैरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या अनुषंगाने राज्याच्या मुख्य सचिवांकडे दूरध्वनीवरून तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
गट-तटावरून चिमटे
वर्धापनदिनानिमित्त मागील ३२ वर्षांत काय काम केले, याची उजळणी करताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, तेव्हा आवाजात दम होता. त्या शिवसैनिकांमुळे आपण येथे आहोत. पण त्यांना आपण विसरत चाललो आहोत काय, असे वाटत आहे. परिस्थिती बदलत आहे, राजकारण होत आहे. ‘चमच्यां’ची भरती होत चालली आहे. कोणी तरी कोणाला तरी वर घेईल, म्हणून प्रयत्न होत आहेत. अनेकजण आले आणि गेले, पण रक्तदानाची गरज असते आणि रक्तच द्यायची वेळ असते, तेव्हा शिवसैनिकच असतो असे सांगत शिरसाट यांनी संघटनेतील गट-तटाच्या राजकारणावर चिमटे काढले. या भाषणाचा संदर्भ वर्धापनदिनाचे प्रमुख वक्ते संजय राऊत यांच्या बोलण्यातही होता.
गट-तट ‘बुडबुडय़ां’सारखे असतात. त्याला प्रवाही करता आले पाहिजे. पालक म्हणून खासदार खैरे यांनी हे काम करावे, असे त्यांनी सांगितले.