30 September 2020

News Flash

नाराजी असली, तरी शिवसेनेचा विजयरथ रोखणार कोण?

राष्ट्रवादीकडून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

निवडणुकांपूर्वी एक नारा जोरदारपणे दिला जातो- ‘जय भवानी जय शिवाजी’ जुन्या शहरातून त्याला प्रतिउत्तर मिळते किंवा ते मिळावे असे खासे प्रयत्न होतात. हिंदू-मुस्लीम असे दोन गट निर्माण होतात आणि मग निवडणूक जिंकणे सोपे होते. औरंगाबाद जिल्ह्य़ातील विकासाचे प्रश्न मग मागे पडले तरी कोणाला फारशी चिंता नसते. एरवी विकासाचा कंठशोष करणारे शेवटी शिवसेनेला जवळ करतात. परिणामी औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला बनतो आणि एकही योजना यशस्वी न करणारे नेते बनतात. खासदार चंद्रकांत खरे यांचे नाव या श्रेणीत अगदी वरचे. या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली आणि खासदार खरे यांनी नि:श्वास सोडला. कोणीही उमेदवार असू द्या, असे थेट आव्हान ते देतात आणि दुसऱ्या बाजूने उमेदवारच ठरत नाही, असे औरंगाबाद लोकसभेचे चित्र आहे.

मतदारसंघाच्या जडणघडणीत खासदाराची भूमिका तशी महत्त्वाची असायला हवी. पण औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खरे यांच्या राजकारणाची पद्धतच तशी निराळी. मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताह आणि त्याच्या भंडाऱ्यासाठी किंवा महाप्रसादासाठी लागणारे सामान भक्तांपर्यंत पुरविणे हेच जणू राजकीय काम असावे अशी ती कार्यपद्धती. पण वैयक्तिक जनसंपर्क दांडगा. तो संपर्क टिकवून ठेवण्यासाठी खासदार चंद्रकांत खरे यांच्याकडे ‘पीए’चीही मोठी फौज आहे. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या की, मंदिरांमध्ये कार्यक्रम वाढतात. तशीच अवस्था जुन्या शहराचीही असते. धार्मिक वातावरण अधिक टोकदार बनेल, अशी व्यवस्था केली जाते. अलीकडच्या काळात  किरकोळ कारणावरून झालेली दंगल या श्रेणीतली. गंगा-जमुनी तहजीब वगैरे असले काही शब्द अधून-मधून मोजके चारचौघे उच्चारत राहतात. निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम शून्य असतो, असाच इतिहास आहे.

गेल्या वर्षभरातील मराठा मोर्चे. त्यामुळे निर्माण झालेले जातीय ध्रुवीकरण याचा या लोकसभा निवडणुकीमध्ये परिणाम होईल, असे सांगणाऱ्यांची संख्याही कमी नाही. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी याच आधारावर शिवस्वराज्य पक्षही स्थापन केला. ते लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचेही सांगत आहेत. मागील पाच वर्षांत खासदार खरे यांच्यावर पक्षात राहून टीका करणारे आमदार जाधव यांनी खासदार निधीतील घोटाळाही चव्हाटय़ावर आणला होता. या तालुक्यातील मतदानावर बऱ्याच निवडणुकीचा कौल ठरतो, असे मानले जाते. मात्र, सर्व तालुक्यांत कार्यकर्त्यांचे जाळे असणारा उमेदवार अजूनही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसून येत नाही. अद्यापि लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघ देण्याची राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसने धुडकावून लावलेली नाही. कारण काँग्रेसचा सतत होणारा पराभव. गेल्या चार निवडणुकीमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खरे यांनी विजय मिळविला. त्यांचा विजयरथ रोखता येईल, असा उमेदवार अजूनही रिंगणात आलेला नाही. ज्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी तयारी केली, त्यांचे पाय ओढण्याचा खेळ नेहमीप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जागा सोडावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी जाहीरपणे केली आहे. राष्ट्रवादीकडून पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, तिढा अद्याप सुटलेला नाही.

सेना-भाजपातही सारे आलबेल आहे असे नाही. शहराची रखडलेली पाणीपुरवठय़ाची योजना, भूमिगत गटार योजनेचे रेंगाळलेले काम, रस्त्यांसाठी निधी असूनही महापालिकेने केलेले दुर्लक्ष, कचऱ्याचा प्रश्न, प्रचंड क्षमता असतानाही न येणारे उद्योग, या कारभाराला महापालिकेतील नगरसेवकांपेक्षा खासदार चंद्रकांत खरेच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपकडून केला जात असे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेच्या खरे यांना मतदान करा, असे सांगणे भाजप नेत्यांनाही जड जात आहे. पण लोकसभेच्या गणितासाठी ते पळतील, असा शिवसेनेचा दावा आहे.

या वेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी नक्की कोणती आणि कशी भूमिका बजावते यावरही काही गणिते ठरण्याची शक्यता आहे. ‘एमआयएम’चा चेहरा या आघाडीनंतर अचानक डाव्या अंगाने धर्मनिरपेक्ष असावा, असा रंगवला जाऊ लागला. त्याला कोणी आक्षेप घेत नाही. त्यामुळे मतांच्या टक्केवारीमध्ये दलित-मुस्लीम मते एकगठ्ठा वळली तर चांगलेच, असा अंदाज करून रणनीती ठरवली जात आहे.

कोणतीही निवडणूक गंभीरपणे घेतोच. पण कोणीही उमेदवार असेल तरी तो पराजय करू शकणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप ठरला नाही. भाजप- सेनेची युती झाली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक जड जाणार नाही. मात्र, गाफील नाही. पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवू.

– चंद्रकांत खरे, खासदार औरंगाबाद

धर्माच्या नावावर कसेही करून मते घ्यायची. त्यामुळे विकास आणि खासदार चंद्रकांत खरे यांचा कधीही संबंधच आला नाही. त्यांनी औरंगाबादला कमालीचे मागे नेले. केंद्र सरकारकडून निधी मिळूनदेखील त्याच्या अंमलबजावणीमध्ये खासदार खरे यांनीच आडकाठी आणली. त्यामुळे औरंगाबाद मागे पडले.

 -अब्दुल सत्तार, आमदार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2019 12:55 am

Web Title: chandrakant khaire congress mla abdul sattar aurangabad lok sabha constituency review
Next Stories
1 भाजपसोबत छुपी नव्हे जाहीर युतीच समजा
2 Women’s Day 2019 : बंजारा पेहराव – वसंतनगर ते न्यूयॉर्कपर्यंत प्रवास
3 औरंगाबाद विभागातून अनिकेत म्हस्के महाअंतिम फेरीत
Just Now!
X