चंद्रकांत खैरे पराभूत, आमदार इम्तियाज जलील आता खासदार

सलग चार वेळा खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी निवडणुकीत यश मिळविले. ही निवडणूक एवढी अटीतटीची होती, की शेवटच्या फेरीपर्यंत निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली. २४व्या फेरीअखेर इम्तियाज जलील यांना तीन लाख ८२ हजार १८८ मते मिळाली, तर खासदार चंद्रकांत खैरे यांना तीन लाख ७२ हजार ३०४ मते मिळाली. मराठा कार्ड खेळत निवडणुकीच्या रिंगणात खासदार खैरे यांना पराभूत करायचे आहे, या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हर्षवर्धन जाधव यांना दोन लाख ७६ हजार ९२ एवढी मते पडली. शिवसेना मतांमध्ये पडलेल्या या फुटीमुळे आमदार इम्तियाज जलील खासदार झाले. अशीच परिस्थिती औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीत होती. तसेच चित्र लोकसभा मतदारसंघातही होते. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला वंचित बहुजन आघाडीने लावलेला हा सुरुंग राजकीयदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

पहिल्या फेरीपासून ते अखेरच्या फेरीपर्यंत आमदार इम्तियाज जलील यांनी घेतलेली आघाडी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना तोडता आली नाही. कन्नड मतदारसंघातून आघाडीचे चित्र निर्माण झाल्यानंतरही एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यापुढे शिवसेनेला जाता आले नाही. दलित आणि मुस्लीम मतांचे एकत्रीकरण करण्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदोद्दीन औवेसी यांना यश आले. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला. निवडणुकीत अखेरच्या फेरीपर्यंत बदल घडतील असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, २४व्या फेरीअखेर शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली आणि निवडणूक मतमोजणी केंद्राबाहेर ‘कौन आया, कौन आया- शेर आया, शेर आया’च्या घोषणा सुरू झाल्या होत्या. मतमोजणीत चित्र बदलल्यानंतर एमआयएम आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाली. त्याचा परिणाम दगडफेकीतही झाला. हर्षवर्धन जाधव यांना मिळालेल्या दोन लाख ७६ हजार ९२ मतांमुळे खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत व्हावे लागले आणि शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना फारशी मते मिळाली नाहीत.

मतमोजणी केंद्राजवळ दगडफेक

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादानंतर जालना रोडवरील मतमोजणीच्या केंद्र परिसरात दगडफेक झाली. यात दोन्ही गटातील मिळून पाच ते सहा कार्यकत्रे जखमी झाले. मात्र तनात पोलिस तत्काळ लाठी घेऊन धावल्याने जमाव पांगला.  जालना रोडवरील चिकलठाणा विमानतळावरील जागेत मतमोजणी गुरुवारी सुरू होती. सुरुवातीपासूनच वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील हे मताधिक्याने शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्यापेक्षा पुढे होते. नंतरच्या काही फेऱ्यांमध्ये खासदार खैरे हे तिसऱ्या क्रमांकावरून हर्षवर्धन जाधव यांना मागे सारून दुसऱ्या क्रमांकावर पुढे आले. त्यानंतर मात्र जलील आणि खैरे यांच्यातील आघाडी कमी-जास्त होत राहिली. त्यातही जलील हेच आघाडी राखून होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना जलील यांचा विजय दृष्ठिपथात दिसू लागला. जलील समर्थक मोठ्या संख्येने मतमोजणीच्या ठिकाणी जमू लागले. त्यानंतर स्वत जलील हेही मतमोजणीच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसू लागला. दरम्यान खैरे यांनी काही प्रमाणात आघाडी घेतल्याचा संदेश पसरला आणि त्यांच्याही समर्थकांमधून ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एकच बाबा, खैरे बाबा’, अशा घोषणा सुरू झाल्या. दोन्ही कार्यकर्ते परस्परांसमोरच घोषणा देऊ लागल्याने जलील, खैरे यांच्या समर्थकांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि त्यातूनच दगडफेक सुरू झाली. त्यामुळे संपूर्ण जालना रोडवर मोठा तणाव निर्माण झाला. पोलिस विभागाकडून अधिकचा मोठा बंदोबस्त मागवण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ती पूर्णपणे नियंत्रण असल्याचा दावा पोलिसांनी केला.

सर्व स्तरातील व्यक्तींनी मला मतदान केले आहे. औरंगाबादच्या विकासासाठी हे मतदान आहे, असे मी मानतो. केवळ दलित आणि मुस्लीम यांनी मतदान केले असे नाही, तर काही हिंदू भागातही मतदान झाले आहे. त्या सर्वाचे मी आभार मानतो.

इम्तियाज जलील- वंचित बहुजन आघाडी उमेदवार

मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी जातीचा आधार घेतला गेला. त्याचा परिणाम दिसून येत आहे.

चंद्रकांत खैरे- शिवसेना उमेदवार