विधानसभा अध्यक्ष बागडे यांची टीका

महापौर परिषदेच्या निमित्ताने औरंगाबादच्या बहुचर्चित ‘समांतर योजने’चा उल्लेख होईल, असे अनेकांना वाटत होते, पण तो खासदार खरे करतील, असे वाटत असताना त्यावर जोरदार टोलबाजी केली विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी. ते म्हणाले, ‘‘समांतर योजना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कडेवर जाऊन बसली आहे. ती आता उतरेल आणि ते बाळ रांगू लागेल असे वाटत होते. पण ती योजना त्यांच्या कडेवरून उतरायलाच तयार नाही.’’ ‘यूडीआयएसएसएमटी’मधून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या समांतर जलवाहिनीचे श्रेय नेहमीच खासदार खैरे यांनी घेतले, मात्र ही योजना तब्बल ११ वर्षांपासून सुरू होऊ शकली नाही. ७८९ कोटी रुपयांची ही योजना विविध आरोपांमुळे सुरूच होऊ शकली नाही. त्यामुळे या योजनेला खैरेचे लाडके बाळ करून विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी केलेली टोलेबाजी भुवया उंचवायला लावणारी होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार म्हणून बागडे यांचे नाव अलीकडच्या काळात चर्चेत आहे.

‘ही योजना उतरून पळायला लागावी असे वाटते,’ असे म्हणत हरिभाऊ बागडे यांनी खासदार खैरे यांच्यावर टीका केली. त्यांनी नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नाकडेही लक्ष वेधले. विकास आराखडा नीटपणे होत नाही. त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याने अवैध वस्त्या होतात. राज्यभर अशीच स्थिती आहे. शहरातून घाण पाणी ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतामध्ये जाते. प्रदूषित होते. खैरेतर या गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे ही जबाबदारी महापालिकेने उचलण्याची गरज असल्याचे बागडे म्हणाले. मात्र, त्यांनी केलेल्या समांतर जलवाहिनीच्या दणदणीत उल्लेखामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र समांतर जलवाहिनीबाबत आपल्या भाषणात कोणताही उल्लेख केला नाही. बागडे यांच्या भाषणापूर्वी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रस्त्यांसाठी आणखी शंभर कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी केली. महापालिका व नगर विकास विभागातील समन्वयासाठी स्वतंत्र सचिव असावा, अशीही मागणी त्यांनी केली होती. समांतर जलवाहिनीच्या प्रश्नातून मार्ग काढावा, असेही ते म्हणाले होते.

आम्ही दिवस मोजतो..!

महापौर भगवान घडमोडे यांचा महापौरपदाचा कालावधी संपत आला आहे. या काळात त्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली. तसेच त्यांच्या कार्यकाळात महापौर परिषदही घेण्यात आली. त्याचे शनिवारच्या महापौर परिषदेमध्ये कोण कौतुक होते, पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापौरपदाचा कालावधी संपत आल्याचे सांगताना चांगलीच धमाल उडवून दिली. ते म्हणाले, ‘महापौरपदाचा काळ आता संपत आला आहे. मी आणि बापू (भगवान घडमोडे) आता दिवस मोजत असतो. आता ४० दिवस राहिले आहेत. उद्या ३९ त्यानंतर ३८ होतील. पण आता दिवस मोजतो आहोत,’औरंगाबादच्या महापौरपदाचा भाजपचा कार्यकाळ संपल्याची आठवण रावसाहेबांनी करून दिली. तत्पूर्वी महापौर घडमोडे यांनी मागण्यांची यादीच सादर केली होती. त्या मान्य झाल्या तर केवळ ‘माजी महापौरांना’ उपयोगी पडतील म्हणून हशा पिकला.

महापौरांच्या लाल दिव्याला खैरेचा पाठिंबा!

शहरात फिरणारा एखादा पोलीस फौजदार त्याच्या गाडीवर पिवळा दिवा लावतो, पण कोणी तरी एक न्यायालयात गेला आणि सगळय़ांनीच दिवे काढण्याचा निर्णय घेतला. महापौर आले अशी ओळख जपण्यासाठी त्यांना आता त्यांच्या गाडीला पाटी लावावी लागते. त्यामुळे महापौरांना त्यांच्या गाडीवर दिवा लावण्याची मुभा असावी, अशी मागणी खासदार खैरे यांनी केली. पण त्यांच्या या मागणीला नंतर कोणी समर्थन दिले नाही.