प्रतिनिधी, औरंगाबाद
निर्भीड पत्रकार आणि स्वातंत्र्यसनिक अनंत भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येत असलेला २०१८ चा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध चित्रपट, नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित समारंभामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख ५० हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता पानट यांनी दिली.
अण्णांच्या पहिल्या स्मृतिदिनापासून अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्याची सुरुवात त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने केली. पहिला पुरस्कार दिवंगत पत्रकार गोिवद तळवलकर यांना कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा चालू असल्याचे डॉ. सविता पानट म्हणाल्या. या वर्षीच्या पुरस्कारासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांची निवड एकमताने करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.
या पूर्वी कुमार केतकर, अरुण टिकेकर, पी. साईनाथ हे ज्येष्ठ पत्रकार; विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, मंगेश पाडगांवकर, ना. धों. महानोर , ग. प्र. प्रधान, मृणाल गोरे, मेधा पाटकर, अभय बंग, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, शिक्षणतज्ज्ञ द. ना. धनागरे आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
चंद्रकांत कुलकर्णी हे मराठी रंगभूमी व चित्रपटांतील एक महत्त्वाचे नाव. ‘पौगंड’ हे नाटक त्यांनी १९८८ ला दिग्दíशत केले तेव्हापासून नुकतेच गाजत असलेले ‘हॅम्लेट’ इथपर्यंतचा त्यांचा मराठी नाटकांचा दीर्घ असा प्रवास राहिलेला आहे. या काळात त्यांनी ‘ध्यानीमनी’, ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’, ‘चारचौघी’, ‘वाडा चिरेबंदी’ (नाटय़त्रयीचा एकमेवाद्वितीय मराठी प्रयोग), ‘गांधी विरुद्ध गांधी,’ ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी महत्त्वाची नाटके रंगभूमीला दिली. मूळचे मराठवाडय़ाचे असलेले चंद्रकांत कुलकर्णी यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी यापूर्वी गौरविण्यात आलेले आहे.
First Published on October 11, 2018 1:01 am