औरंगाबाद : जनतेच्या हितासाठी घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका नव्या आघाडी सरकारने लावला आहे. १२ हजार कोटी रुपयांच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना स्थगिती दिली असून मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृती देण्याच्या ‘सारथी’ ची स्वायत्तता काढून घेणे चुकीचे आहे. तुमचा वाद आमच्याशी होईलच, पण अशा प्रकारे काम थांबविणे चुकीचे असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.

औरंगाबाद महापालिकेत भाजपा आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असेही ते म्हणाले. मराठवाडय़ातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी सोमवारी घेतली. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारकडून सुरू असणाऱ्या स्थगितीच्या निर्णयावरुन टीका केली.

सरकारमध्ये जाण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ म्हणण्याऐवजी आता ते ‘वंदनीय बाळासाहेब’ असा उल्लेख करू लागले आहेत. ते सरकारमध्ये कसे आले ते सगळय़ांनी पाहिले आहे. या पुढे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अधिक मजबुतीने बांधणी करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकीचा लांबलेला कार्यक्रम पूर्ण व्हावा, यासाठी दौरा करीत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. १२ कोटी रुपयांच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्याची २५:१५ लेखाशीर्षांतून होणारी कामेही थांबविली आहेत. आधीच यात निधी कमी मिळतो आता तेही थांबविल्याने गावकऱ्यांनी काय पेढे वाटायचे काय, असेही चंद्रकांत पाटील तिरकसपणे म्हणाले.

गेल्या काही महिन्यात ‘सारथी’योजनेतून विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या ५०० जणांना मदत केली होती. मात्र, या योजनेची स्वायत्तता काढून घेण्यात आली आहे. त्याचे वाईट परिणाम होतील. सरकारने चांगल्या योजनांना स्थगिती देण्याचे थांबवावे. ‘मेट्रो’ सारख्या मोठय़ा प्रकल्पाबाबतची भूमिका तपासणे एकवेळ मान्य करता येईल. आता त्या भूमिकेवरही ते बॅकफूटवर आले आहेत. मेट्रो हवी आहे पण आरेतील झाडांचा प्रश्न असल्याचे ते सांगत आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मात्र, एकनाथ खडसे यांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मौन  पाळले. पंकजा मुडे या बठकीला का गैरहजर राहिल्या याविषयीच्या प्रश्नावर ते म्हणाले, त्यांची प्रकृती बरी नसल्याचे त्यांनी कळविले होते. या शिवाय १२ डिसेंबर रोजीचा मेळावा मोठा करायचा असल्याने त्या आल्या नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.