भारतीय संघाचा माजी कर्णधार तथा क्रिकेटपटू मोहम्मद अझरूद्दीन याच्यासह तीन जणांवर ट्रॅव्हल्स कंपनीची २० लाख ९६ हजार ३११ रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद शहाब मोहम्मद असे तक्रारदाराचे नाव असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ नागरे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश अव्वेकल, मोहम्मद अझरूद्दीन यांच्या नावाने मुजीब खान यांनी दानिश टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीकडून मुंबई-दुबई-पॅरिस व पॅरिस-दुबई-दिल्ली अशी विमानाची तिकीटे बुक केली होती. बुक केलेल्या तिकीटाचे पैसे नंतर देतो असे सांगून मुजीब खान यांनी दिलेला धनादेश वटला नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोहम्मद शहाब मोहम्मद यावूब यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुदेश अव्वेकल, मोहम्मद अझरूद्दीन व अझरूद्दीनचा खासगी सचिव मुजीब खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अमरनाथ नागरे करीत आहेत. दरम्यान, अझरूद्दीनचा खासगी सचिव मुजीब खान हा औरंगाबादचा असल्यामुळे आमचे यात्रा कंपनीशी व्यवहार सुरू होते, असे तक्रारदार मोहम्मद शहाब यांनी सांगितले.