मराठवाडा अध्यापक महाविद्यालयात कागदपत्रांमध्ये फेरफार करुन अवैध पद निर्माण केल्याप्रकरणी मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या प्रमुख फातेमा झकेरीया अडचणीत सापडल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्यासह मकदुम फारुकी, शेख इम्रान शेख रमजान आणि अल्ताफ कुरेशी या तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयातील  डॉ. शेख इमरान शेख उस्मान (३९, रा. मजनु हिल, दगडी महल) यांच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. डॉ. इमरान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २००५ मध्ये मराठवाडा अध्यापक महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून रुजू झाल्यानंतर २० सप्टेंबर २०१६ रोजी निवड समितीतर्फे त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली. पण, यादरम्यान प्रकृती खालावल्याने डॉ. इमरान हे १७ नोव्हेंबर ते २२ फेब्रुवारी २०१७ पर्यंत वैद्यकीय रजेवर गेले. रजेवरुन परतल्यानंतर मात्र, सहयोगी प्राध्यापक डॉ. शेख इमरान रमजान यांनी डॉ. इमरान यांना दालनात जाण्यास विरोध केला. तसेच झकेरीया यांनी कार्यभार न स्वीकारण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यावरुन डॉ. इमरान यांनी झकेरीया यांना त्याचा जाब विचारला. तेव्हा झकेरीया यांनी आपण संस्थेविरुध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे तक्रारी केल्याचा संदर्भ दिला.

डॉ. इमरान हे रजेवर असताना झकेरीया यांनी त्यांना प्राचार्य पदावरुन काढण्याचा कट रचल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. महाविद्यालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये डॉ. इमरान यांच्या बनावट सह्या करुन उच्च न्यायालयात खोटे दस्ताऐवज सादर करण्यात आले आहेत. डॉ. इमरान यांचा बनावट राजीनामा देखील तयार केला आहे. तसेच महाविद्यालयाच्या हजेरी रजिस्टरमध्ये बदल करुन झकेरीया व त्यांच्या साथीदारांनी शेख इमरान रमजान व अल्ताफ कुरेशी यांना पदावर बसवल्याचे डॉ. इमरान यांनी म्हटले आहे. उच्च न्यायालयासमोर ही बाब मांडल्यानंतर न्यायालयाने संबंधित पोलीस ठाण्यात याप्रकरणी फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचे सुचवले. त्यावरुन डॉ. इमरान यांनी पोलिसात तक्रार दिली.