औरंगाबाद : धनादेश बँकेत पुरेशा रकमेअभावी वटला नाही. याप्रकरणात फरार असलेल्या आरोपीस तब्बल बारा वर्षांनी अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण बाळासाहेब काळे, असे आरोपीचे नाव आहे. तो खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथील रहिवासी आहे. त्याने एमआयडीसी चिकलठाणा कंपनीतील एका वॉचमनला ५० हजारांना गंडविले आहे. तो फरार झाला होता.

एमआयडीसी चिकलठाणा येथील श्री एंटरप्राइजेस कंपनीत शिवराम गंगाराम कोरकने हे वॉचमन म्हणून कामाला होते. कोरकने यांनी प्रवीण काळे याची मिनीडोअर रिक्षा एक लाख १६ हजारांत खरेदी केली होती. हा व्यवहार काळेच्या हडको, एन-९ मधील घरी करण्यात आला होता. या वेळी पन्नास हजार रुपये रोख व उर्वरित ५६ हजारांची रोकड फायनान्स कंपनीचे कर्ज काढून देणार व त्याचे हप्ते कोरकने फेडणार असले ठरले होते. त्यानंतर काही दिवसांनी काळे त्यांना भेटला. त्याने आपल्याला रिक्षा विकायची नाही. आता रिक्षा परत करा, तुमचे पैसे परत करतो, असे म्हणून त्याने स्टेट बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजार सावंगी शाखेचे प्रत्येकी २८ हजारांचे दोन आणि एक नऊ हजारांचा धनादेश कोरकने यांना दिले.

सुरुवातीला नऊ हजारांचा धनादेश कोरकने यांनी बँकेत वटविण्यासाठी दिला. मात्र, काळेच्या खात्यात रक्कम नसल्याने तो परत आला. खात्यात पैसे नसल्याने उर्वरित दोन चेक कोरकने यांनी बँकेत वटविण्यासाठी टाकले नाही. त्यांनी थेट काळेची भेट घेऊन त्याच्याकडे पशांची मागणी केली. पण नेहमी त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कोरकने यांनी सिडको पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर काळे फरार झाला होता.

दरम्यान, त्याच्याबाबत माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार सय्यद मुजीब अली, पोलिस नाईक गजानन मांटे, भावसिंग चव्हाण यांनी त्याला पकडले.