अजित पवार यांची मागणी

औरंगाबाद : मराठवाडय़ात पाण्याची स्थिती गंभीर आहे. राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांसह मराठवाडय़ात बैठक घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. औरंगाबाद येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. यापूर्वी मराठवाडय़ासाठी मुख्यमंत्रीपदी विलासराव देशमुख असताना आम्ही मराठवाडय़ात मंत्रिमंडळाच्या बैठका घेतल्या होत्या. तशा बैठका घेऊन या भागाला न्याय देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी कर्जमाफीच्या याद्या किमान संकेतस्थळावर तरी जाहीर करा, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सप्टेंबर महिन्यात पावणेदोनशे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जायकवाडीसह बहुतांश धरणात पाणीसाठा नाही. त्यामुळे भविष्यात मोठे संकट येईल, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने पाऊले उचलावीत, असे ते म्हणाले.

राज्य सरकारने जलयुक्त शिवाराची केलेली कामे अपयशी ठरली काय असे विचारले असता ते म्हणाले, ‘पाणलोटाव्यतिरिक्त पडणारा पाऊस या योजनेत साठवला जातो. मात्र, अनेक ठिकाणी पाऊसच झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी उपाययोजना करायला हव्यात.’ येत्या काळात मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यात नांदेड जिल्ह्य़ाचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला.

बीडमध्ये आपल्यातलेच काही जण इकडून तिकडे गेले आहेत. पण त्यांना त्यांचा पक्ष लखलाभ. पण त्याही जिल्ह्य़ात विशेष लक्ष देऊ, असे सांगत पवार यांनी आता पक्षासाठी कार्यकर्त्यांनीही निधी लावायला पाहिजे, असे म्हटले. तुमच्या वैयक्तिक प्रगतीमध्ये पक्षाचाही वाटा आहे. त्यामुळे येत्या काळात कार्यकर्त्यांनी पाच-दहा टक्के का असेना, पक्षासाठी निधी खर्चावा, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर त्यांनी टीका केली. इंधनात झालेली दरवाढ थांबवता येणे शक्य आहे. कर्नाटकात दोन रुपयांनी पेट्रोल स्वस्त केले आहे. राज्यातही पेट्रोल स्वस्तात देता येऊ शकते. पण नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेऊ, असे सांगत आहेत. आता यांची योग्य वेळ कधी येणार, असेही ते म्हणाले. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राजेश टोपे, संग्राम कोते पाटील यांचीही भाषणे झाली. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

‘सत्ता आल्यावर दुरुस्ती करू’

अनेक वर्षे सत्तेत असताना वेगवेगळी माणसे पाहिली आहेत. आता विरोधात असतानाही कोण कसे वागते, हे पाहत आहे. त्यामुळे आपल्याकडे सत्ता आल्यानंतर त्यात योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करायला हवा, असे सांगितले.