‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ प्रदर्शन, उद्योजकांबरोबर चर्चा

औरंगाबाद : येथे होणाऱ्या ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार असून ते तीन जिल्ह्य़ांचा आढावा घेणार आहेत. यात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्य़ाचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातील समस्यांबाबतही महापालिकेचा स्वतंत्र आढावा ते घेणार आहेत. सकाळी मुख्यमंत्र्यांसमवेत उद्योजकांची एक स्वतंत्र बैठकही होणार आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मराठवाडय़ात येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी जालना, बीड, नांदेड, हिंगोली या जिल्ह्य़ांना वगळून तीन जिल्ह्य़ांचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ाचा तसेच महापालिकेतील समस्यांचा आढावा अशा दोन स्वतंत्र बैठका होणार असून उस्मानाबाद व परभणी जिल्ह्य़ातील प्रश्नही त्यांच्यासमोर मांडले जाणार आहेत. जि.प. रस्त्यांची स्थिती, अवकाळी पाऊस, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सिंचनाचे अपूर्ण प्रकल्प, वीज जोडणीसाठी आलेले अर्ज आणि प्रत्यक्षात केलेली कारवाई, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, पोलीस गृहनिर्माण आढावा यांसह आरोग्य सुविधांचाही आढावा बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी आमदार, खासदार आणि विधान परिषद सदस्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

‘मसिआ’ या औद्योगिक संघटनेच्यावतीने होणाऱ्या ‘अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र’ या  प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचीही उपस्थिती असेल. कलाग्राम येथे होणाऱ्या या प्रदर्शनस्थळी लोकसत्ताच्यावतीने लघु व मध्यम उद्योजकांसाठी दुपारी साडेचार वाजता चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यास उद्योगमंत्री उपस्थित राहणार आहेत.