मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला टोला

औरंगाबाद : निवडणुका तोंडावर आल्या की भूमिपूजन केले जात असल्याच्या भाजपकडून होणाऱ्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे चांगलाच समाचार घेतला. आम्ही कामे करायची नाहीत का, असा प्रश्न करत ठाकरे यांनी, केवळ घोषणाबाजी करणारे आम्ही नाही तर उद्योग, पाणीप्रश्न सोडवून विकासाच्या आड येणारे खड्डे बुजवणारे सरकार असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे चांगलेच टोले लगावले. पाण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकाररूपातली कावड वाहणारा श्रीखंडय़ा होऊन आल्याचेही ते म्हणाले. शेतक ऱ्यांचे प्रश्न समजून, ऐकून त्यातून ताटकळत न ठेवता मार्ग काढणारे आम्ही आहोत, असे सांगत ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारवरही शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निशाणा साधला.

औरंगाबादमधील १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन स्मारक, सफारी पार्कसह १५४ कोटींच्या रस्ते कामांचा भूमिपूजन सोहळा मख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते.

रखडलेल्या योजनांना पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, रस्ते, पाणी, महामार्ग यातून औरंगाबादकरांसह विविध उद्योगांना येथे आणून मराठवाडय़ातील पदवीधरांचाही विकास साधायचा आहे. पाण्यासारखा महत्त्वाचा प्रश्न सोडवता येण्यासारखे दुसरे मोठे काम नाही, असे सांगत त्यांनी संत एकनाथांच्या श्रीखंडय़ाचेही उदाहरण दिले. पाण्याची कावड वाहणाऱ्या श्रीखंडय़ासारखे काम करायला मिळणेही एक प्रकारे भाग्याचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. पैठणचाही पाण्याचा प्रश्न सोडवू, अशी ग्वाहीही त्यांनी फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांच्या मागणीचा संदर्भ देऊन दिली.

काम करता येत नसेल तर त्याला लाडके मुख्यमंत्री ही बिरुदावली कशाला लावायची, असा चिमटाही त्यांनी काढला. विकासाच्या मार्गात बरेच खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करायचे आहेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे, शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आदी उपस्थित होते.

विमानतळ नामविस्ताराचा प्रस्ताव प्रलंबित

औरंगाबाद येथील विमानतळाच्या नामविस्ताराचा प्रश्न आणि दिल्लीत शेतक ऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनावरून मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारवही निशाणा साधला. समृद्धी महामार्गाची पाहणी करताना अनेक शेतक ऱ्यांनी त्यांचे प्रश्न मांडल्याचे सांगून ठाकरे यांनी आम्ही प्रश्न ऐकून, समजून घेणारे असून ताटकळत ठेवणारे नाहीत, असे सांगत केंद्र सरकारला अप्रत्यक्ष लक्ष्य केले. केंद्राकडे औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, असे नामकरण करण्याचा प्रस्ताव पाठवला असून अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले. गुंठेवारी, सिडकोतील गृहप्रकल्पाचेही प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.