सिडको-हडको भागातील १० वॉर्डामध्ये विस्कळीत पाणीपुरवठा झाल्याबद्दल औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला नोटीस बजावण्यात आली. महापालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तसे आदेश दिले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १२ तास काम चालू राहील, असे कंपनीने कळविले होते. ५७ ठिकाणी दुरुस्ती कामे केल्याचा दावाही केला होता, मात्र दुसऱ्याच दिवशी तो दावा फोल ठरला. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यावरून आयुक्तांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना आणि कंपनीला चांगलेच खडसावले होते.
सिडको भागातील एन ७ येथे जलकुंभाला लागलेली गळती न थांबल्यामुळे सोमवारी तणाव निर्माण झाला होता. गळती न थांबल्यामुळे पुन्हा साहित्याची जुळवाजुळव करण्यास बराच वेळ गेल्याने १० वॉर्डात ६ दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी नागरिक संतापले. नगरसेवकांनी जलकुंभावर रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला. आयुक्त केंद्रेकर यांनी जलकुंभावर जाऊन कंपनीचे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. विस्कळीत पाणीपुरवठय़ाबद्दल कंपनीला नोटीस देण्याची सूचना केंद्रेकर यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना केली होती. ती नोटीस आज बजावण्यात आली. पाण्याबद्दल निर्माण झालेल्या रोषास कंपनी जबाबदार असणार आहे. कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा नोटिशीद्वारे विचारण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 1:54 am