औरंगाबादमध्ये येणाऱ्या काळात पाणी प्रश्न पेटणार याची झलक आज (गुरूवार) पालिकेत पाहायला मिळाली. नियमित पाणी पुरवठा व्हावा, या मागणीसाठी देवनगर येथील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका शोभा बुरांडे यांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. या वेळी महापौर आणि आयुक्तांना आंदोलकांनी घेराव घातला.

देवनगर परिसर महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होऊन १० ते १५ वर्ष झाले. मात्र अद्याप पालिकेकडून पाणीपुरवठ्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही. पालिकेने या परिसरासाठी पाइपलाइनच टाकलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावतोय. उन्हाची काहिली वाढली तशा पाण्याच्या झळा अधिक सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे आज पाणी प्रश्नाचा लढा पालिकेवर पोहचला.
पालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता असताना पाण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांना संघर्ष करावा लागतोय. यावरून येणाऱ्या काळात औरंगाबादमध्ये पाण्यासाठीचा संघर्ष अधिक टोकाचा होणार हे निश्चित आहे.
या वेळी नागरिकांनी परिसरात अंतर्गत पाइपलाइनला तत्काळ मंजुरी द्यावी अन्यथा येणाऱ्या काळात पाण्यासाठी व्यापक जण आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. दरम्यान, आजची सर्वसाधारणसभा देखील पाणी प्रश्नावर गाजली. यावेळी महिला नगरसेवक आक्रमक झाल्या होत्या. नियमित पाणीपुरवठा नसणे, गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत असल्याचे नगरसेवक म्हणाले. प्रशासनाने नियुक्त केलेला अधिकारी फोन ही उचलत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली.