वाशी पोलीस ठाण्यासमोर नागरिकांचा ठिय्या

ऐन सणासुदीत तीन कुटुंबीयांना जबर मारहाण करून दरोडा टाकणाऱ्यांचा  पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, या मागणीसाठी तालुक्यातील इंदापूर येथील ग्रामस्थांनी शनिवारी वाशी पोलीस ठाण्यावरच मोर्चा काढला. घटना घडून दोन दिवस उलटले. श्वान पथक गोलेगाव येथील पारधी पेढीपर्यंत गेले. मात्र तेथून पुढे पोलिसांना तपासाचा छडा लागत नाही. त्यामुळे दरोडेखोर हे पारधी पेढीतीलच असावेत, असा ग्रामस्थांमध्ये संशय बळावला आहे.

इंदापूर येथे चार अज्ञात दरोडेखोरांनी तीन घरांवर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. या दरोडेखोरांनी २० मिनिटांत तीन घरांवर दरोडा टाकला. या वेळी तिन्ही घरातील लोकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी तलवार, सत्तूर, रॉडच्या साहाय्याने त्यांना मारहाण केली. या मारहाणीत संदीपान गपाट, मंजुषा गपाट, हनुमंत गपाट, उमा गपाट व शिवाजी गपाट जखमी झाले. यापकी संदीपान गपाट व हनुमंत गपाट यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. या सर्व जखमींवर उस्मानाबादच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंदापूर गावात शनिवारी या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी वाशी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत दरोडेखोरांना तत्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास मोळवणे, मनसेचे राजेंद्र गपाट, भाजपाचे शहराध्यक्ष बबन कवडे, जाणीव संघटनेचे रामभाऊ लगाडे, िहदूराज गपाट आदींची उपस्थिती होती.