News Flash

शहर बँकेतील कर्ज घोटाळ्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून ‘उत्खनन’

बँकेत त्यावेळी कर्ज वितरण विभागाकडे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे.

शहर सहकारी बँकेतील कर्जघोटाळा गुन्ह्य़ाचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केला असून बँकेकडून कागदपत्रे मागवली गेली आहेत. बँक कर्मचारी कागदपत्रांचे गठ्ठे घेऊन उपस्थित झाले होते.

शहर सहकारी बँकेत झालेल्या कर्ज घोटाळ्याचे ‘उत्खनन’ पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुरु केले असून त्यासाठी सन २०१२ पासूनच्या कर्जाची माहिती, त्यासंदर्भातील कागदपत्रांची माहिती बँकेकडून मागवली आहे. त्यासाठी बँकेत त्यावेळी कर्ज वितरण विभागाकडे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. ‘एम्स’ या संशयित रुग्णालयातील ज्या महागडय़ा उपकरणांसाठी कर्ज घोटाळा घडवला गेला, ती उपकरणे तरी रुग्णालयात अस्तित्वात आहेत की नाहीत, याची कर्ज प्रकरणनिहाय तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

कर्जघोटाळ्याच्या तपासी अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कालपासून गुन्ह्य़ाचा तपास शाखेमार्फत सुरु केल्याची माहिती दिली. एम्स रुग्णालयातील महागडय़ा उपकरणांसाठी तीन डॉक्टरांच्या नावे बनावट कर्जप्रकरण करुन, बनावट खाती उघडून, फसवणूक करुन सुमारे ४५ कोटी रुपयांचा अपहार केला. प्रत्यक्षात उपकरणे किंवा यंत्रसामुग्री खरेदी झालीच नाही, या तक्रारीनुसार रुग्णालयाचा प्रमुख डॉ. नीलेश शेळके, त्याला मदत करणारे योगेश मालपाणी, विजय मर्दा यांच्यासह बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी अशा एकूण २५ जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा आता तपासासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

बँकेची काल, शुक्रवारी वार्षिक सभा होती. या सभेनंतर लगेचच सभागृहातच गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर होण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार काही अधिकारी कर्जघोटाळ्याची माहिती घेऊन दुपारनंतर उपस्थित झाले होते. या घोटाळ्यात एकूण १८ कर्जप्रकरणांचा समावेश आहे. त्याचे गठ्ठे घेऊन कर्मचारी उपस्थित झाले होते. दरम्यान शाखेच्या पथकाने सखोल चौकशीचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे एक प्रकारे आता कर्जघोटाळ्याचे उत्खननच सुरु झाल्याचे मानले जाते.

डॉ. नीलेश शेळके सापडेना!

शुक्रवारी नोटिसा बजावल्यानंतर काही संचालक व बँक अधिकाऱ्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेने आज केल्याचे समजले. या गुन्ह्य़ात एकू ण २५ आरोपी आहेत. बहुतांश आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावल्या गेल्या आहेत. मात्र या गुन्ह्य़ाचा मुख्य सूत्रधार डॉ. नीलेश शेळके याला आज सायंकाळपर्यंत नोटिस बजावली गेली नव्हती. पोलिसांना तो शहरात आढळला नाही, असे समजले. त्यामुळे आता त्याच्या घरावर पोलिस नोटिस डकवणार असल्याचे समजले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 1:16 am

Web Title: city bank loan scam excavation from economic offenses wing
Next Stories
1 ढिगाऱ्यातून झेपावलेले ‘फिनिक्स’
2 मराठवाडय़ात राष्ट्रवादीची ‘धामधूम’!
3 शैक्षणिक गुणांवर जीवन तोलू नका
Just Now!
X